Sun, Oct 20, 2019 02:05होमपेज › Pune › सांगवीत ‘ग्रेडसेपरेटर’ धोकादायक

सांगवीत ‘ग्रेडसेपरेटर’ धोकादायक

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 14 2017 11:54PM

बुकमार्क करा

पिंपरी : नरेंद्र साठे

पिंपरी-चिंचवड शहर हे सुनियोजित आणि चांगल्या दर्जाच्या रस्त्यांसाठी प्रसिद्ध आहे. शहरातील सांगवी फाट्यावर उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटर काही महिन्यांपूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. भव्यदिव्य असे काम वाटत असले, तरीदेखील प्रत्यक्षात येथे पादचार्‍यांसाठी मोठी गैरसोय झाली आहे. डांगे चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावरून सांगवीकडे जाणार्‍या रस्त्यावर जाण्यासाठी पादचार्‍यांसाठी कुठल्याच सुविधेचा महापालिका अधिकार्‍यांकडून विचार केलेला नाही.

औंध गावातून येणारा रस्ता आणि विद्यापीठाकडून येणार्‍या रस्त्यावरून येणारी वाहने एकाच वेळी सांगवीकडे जाणार्‍या ग्रेडसेपरेटरमध्ये प्रवेश करताना छोटे अपघात झाले आहेत. विद्यापीठाकडून येणार्‍या वाहनांना जर सेवारस्त्याने पुढे जावयाचे असेल आणि औंध गावातून येणार्‍या वाहन चालकाला सांगवीच्या ग्रेडसेपरेटरमध्ये जावयाचे असल्यास या दोघांचा ताळमेळ न बसल्यास वाहने एकमेकांवर आदळत आहेत. या संदर्भात ‘पुढारी’तून वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

त्यानंतर आता पादचार्‍यांच्या दृष्टीने कुठलीच उपाययोजना केली नसल्याचे पाहणीमध्ये आढळून आले. ग्रेडसेपरेटरमधून पादचार्‍यांना जाण्यास अतिशय अरुंद असा पदपथ तयार करण्यात आला आहे; परंतु हा पादचार्‍यांचा विचार करून तयार केलाच नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे; कारण या ठिकाणाहून एक व्यक्तीदेखील व्यवस्थित चालू शकत नाही. शिवाय ग्रेडसेपरेटरची लांबी जास्त असल्याने रात्री या ठिकाणाहून जाणे महिलांबरोबर सर्वांनाच भीती वाटते. सांगवी फाट्यावर उतरूच नका, असे अजब उत्तर महापालिकेचे अभियंते देत आहेत. सोईसाठी बदल केले जातात की, गैरसोईसाठी हेच कळत नसल्याची प्रतिक्रिया नागरिक उद्विग्न होऊन देत आहेत.

सांगवीत येणार्‍या बहुतांश पीएमपीएमएलच्या बसचा मार्ग हा औंध डीपी रस्त्यावरून आहे. त्यामुळे नागरिकांचा मोठा वेळ जातो. वेळ वाचवण्यासाठी अनेक प्रवासी हे सरळ मार्गाने जाणार्‍या बसने प्रवास करून सांगवी फाट्याला उतरतात; परंतु सांगवी फाट्यावरून सांगवीच्या बाजूला जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. तरुण मुले ‘बीआरटीएस’च्या बॅरिकेट्सवरून धोकादायक पद्धतीने उड्या मारून दुसर्‍या बाजूला जातात; परंतु वयोवृद्ध किंवा महिलांना असे करता येत नाही; शिवाय या ठिकाणी अनेक खासगी बस आणि कॅबचालक प्रवाशांना उतरवतात. त्यामुळे नागरिकांना दुसर्‍या बाजूला जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. या ठिकाणी पीएमपीचा अधिकृत बस थांबा नसला, तरी प्रवाशांच्या सांगण्यावरून अनेक बस चालक प्रवाशांच्या सोईसाठी त्यांना तिथे सोडतात. त्यामुळे सांगवीतील नागरिकांच्या सोईसाठी महापालिकेने उपाययोजना कराव्यात, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.

स्काय वॉक हवा...

भुयारी मार्ग तयार करण्यात आले; परंतु एक केवळ ‘बीआरटीएस’ मार्गापर्यंत मर्यादित आणि दुसरा जिल्हा रुग्णालयासाठी. त्यामुळे मधील सांगवीच्या नागरिकांच्या सोईचा विचार करण्यात आला नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. नागरिकांच्या सोईसाठी स्काय वॉक तयार करण्याची मागणी नागरिक करत आहेत. शिवाय भुयारी मार्गातून रात्रीच्या वेळी महिलांना जाण्यास भीती वाटते त्यामुळे स्काय वॉक तयार करावा, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.