Fri, Apr 19, 2019 07:57होमपेज › Pune › तेलगीची मालमत्ता सरकार जमा करा; पत्‍नीची मागणी

तेलगीची मालमत्ता सरकार जमा करा; पत्‍नीची मागणी

Published On: Dec 16 2017 6:35PM | Last Updated: Dec 16 2017 6:38PM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

देशात खळबळ उडवून टाकणार्‍या बनावट मुद्रांक घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अब्दुल करीम लाडसाब तेलगीचे नुकतेच निधन झाले. त्याची स्थावर मालमत्ता सरकार दरबारी जमा कराव्यात, अशी मागणी त्याची पत्नी शाहिदा अब्दुल करीम तेलगी (वय ५७ सध्या रा. खानापूर, बेळगाव) हिने न्यायालयात केली आहे. सीबीआयने फेरतपास करावा आणि तेलगीने जमविलेल्या सर्व मिळकती सरकार जमा कराव्यात, असा अर्ज न्यायालयापुढे सादर केला आहे. पुणे येथील विशेष मोक्‍का न्यायालयात ही सुनावणी झाली.

अ‍ॅड मिलिंद द. पवार, अ‍ॅड प्रशांत जाधव यांनी पुण्यातील विशेष मोक्‍का न्यायालयात शाहिदा हिच्या वतीने अर्ज केला. तेलगीने देशात सुमारे ६० हजार कोटींचा बनावट मुद्रांक घोटाळा करून खळबळ उडवून  दिली होती. तेलगीच्या घोटाळ्याने तपास यंत्रणा व तत्कालीन सरकार पुढे मोठे आव्हान उभे केले होते. तेलगीच्या घोटाळ्याची व्याप्ती जवळपास १३ राज्यात पसरली होती. 

पोलिस अधिकारी, व्यावसायिक, राजकीय नेते यांनी तेलगीला बनावट मुद्रांक घोटाळा करण्यासाठी मदत केली. या कारणास्तव अनेकांना अटक करण्यात आली होती. शाहिदा तेलगी हिनेदेखील पती अब्दुल करीम तेलगीला गुन्ह्यासाठी मदत केली, असा तिच्यावर आरोप असून खटल्याची सुनावणी अद्याप सुरू आहे. शाहिदा व जवळच्या नातेवाइकांच्या नावावर काही स्थावर मिळकती बनावट मुद्रांक घोटाळ्याच्या पैशातून खरेदी केल्या. म्हणून शाहिदाने मुख्य आरोपी तेलगीला मदत केली, असा आरोप ठेवून तिलाही सीबीआयने बनावट मुद्रांक घोटाळा प्रकरणी अटक केली होती. मोक्‍का न्यायालयाचे न्यायाधीश एस एच ग्वालानी यांच्यासमोर सुरू आहे व सरकार पक्षाच्यावतीने साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्याचे काम चालू आहे.

खटल्यातील मुख्य आरोपी तेलगीचे नुकतेच निधन झाले. आरोपी शाहिदा तेलगी ही जामीनावर बाहेर असून, सध्या खानापूर, बेळगाव येथे मूळ गावी वास्तव्यास आहे. ती देखील अनेक आजारांनी त्रस्त आहे. तेलगीच्या मृत्यूनंतर कर्नाटक राज्यातील बेळगाव, खानापूर व इतर काही ठिकाणच्या स्थावर मिळकती आहेत. ज्या तेलगीने खरेदी केलेल्या आहेत. त्याच्या आयकर विभागाकडे नोंदी आहेत. त्यावर तेलगीने आयकर भरलेला आहे. कुटुंबातील वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर मालमत्ता खरेदी केल्या आहेत. अशा सर्व स्थावर मिळकती सीबीआयने फेरतपास व खातरजमा करून सरकारजमा करून जप्त कराव्यात, अशी मागणी शाहिदाने केली आहे. 

शाहिदा ही देखील नेहमी आजारी असते. बनावट मुद्रांक घोटाळ्याशी तिचा काही एक संबंध नव्हता. फक्त तिच्या पतीच्या दुष्‍कृत्यामुळे तिलाही या खटल्यात गोवले गेल्याचे तिचे म्हणणे आहे. या प्रकरणावरील पुढील सुनावणी ३ फेब्रवारी रोजी होणार आहे.