Sun, Aug 18, 2019 14:21होमपेज › Pune › 'सरकारने साखरेला प्रतिक्विंटल ४०० रुपये अनुदान द्यावे'VIDEO

'सरकारने साखरेला प्रतिक्विंटल ४०० रुपये अनुदान द्यावे' VIDEO

Published On: Dec 09 2017 5:29PM | Last Updated: Dec 09 2017 5:33PM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

साखरेच्या घटणाऱ्या बाजार भावामुळे राज्य सहकारी बँकेने साखरेवरील तारण कर्जाचे मूल्यांकन कमी केले आहे. त्यामुळे उसाला एफआरपी इतका दर देणे शक्य होणार नाही. त्यामुळे निर्यातीवरील २० टक्के शुल्क रद्द करून ते शून्य करावे. साखरेवरील साठा मर्यादा हटवावी, केंद्राने २० लाख टनाचा बफर साठा करावा आणि साखर निर्यातीला केंद्र व राज्याने मिळून प्रति क्विंटल चारशे रुपये अनुदान द्यावे अशी मागणी राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांनी पत्रकार परिषदेत केली.

साखरेच्या निविदा प्रति क्विंटल ३५५० रुपयांवरून घसरून ३२०० रुपयांच्या खाली जात आहेत. या चिंताजनक स्थितीवर संघाच्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली. याबाबतच्या मागण्या केंद्र व राज्य सरकारकडे करण्यात आल्या आहेत. त्याची माहिती देण्यासाठी शनिवारी साखर संकुल येथे दुपारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ आदी यावेळी उपस्थित होते.

साखरेचे दर पडण्याचे षडयंत्र : हर्षवर्धन पाटील

राज्यात उसाचा गाळप हंगाम सुरू झाला असून २५ टक्के गाळप पूर्ण झाले आहे. यातच गेल्या महिनाभरात साखरेच्या दराच्या निविदा प्रति क्विंटल ४०० ते ५०० घटण्यामागे राज्यात एक षडयंत्र कार्यरत असल्याचा गौप्यस्फोट माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी बोलताना केला.  सात ते आठ बड्या व्यापाऱ्यांमार्फत दर पाडण्यात येत आहेत, असा आरोप करताना या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. 

कोट्यवधी लोकांनां रोजगार देणारा उद्योग आहे. साखरेवरील जीएसटीमुळे प्रति क्विंटल १८५ रुपये कर द्यावा लागत आहे. तर यातून तीन ते चार हजार कोटींची महसूल सरकारला मिळत आहे. त्यामुळे अडचणीच्या काळात सरकारने निर्यातीला अनुदान द्यावे. जेणेकरून साखरेचे दर ४० रुपये किलोपर्यंत नियंत्रणात राहतील, आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव स्थिर आहेत. तर फिलीपाईन्स व इराण ने साखर आयातीवर बंदी घातली आहे. पाकिस्तानने अनुदान देत १५ लाख टन निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले आहे. ही साखर भारतात आल्यास साखरेचे दर क्विंटलला३००० च्या खाली येऊ शकतात, अशी भीतीही पाटील यांनी व्यक्त केली. साखर आयात पूर्णपणे बंद करून निर्यातीला चालना द्यावी, अशी मागणीही पाटील यांनी केली.