Tue, Jul 16, 2019 09:39होमपेज › Pune › हवाई दलाची जागा ताब्यात घेण्यास सरकारला अपयश

हवाई दलाची जागा ताब्यात घेण्यास सरकारला अपयश

Published On: Mar 21 2018 2:10AM | Last Updated: Mar 21 2018 12:49AMपुणे : देवेंद्र जैन

मोठा गाजावाजा करून जाहीर केलेली लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी हवाई दलाची 15.84 एकर जागा सरकारला ताब्यात घेण्यास दोन वर्षानंतरसुद्धा अपयश आल्याचे दिसून येते. माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी 15 मे 2016 रोजी पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार जगदिश मुळीक, योगेश टीळेकर, स्थानिक लोकप्रतिनिधी, भारतीय हवाई दल, विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी  व पुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासमवेत एक बैठक घेऊन गाजावाजा केला. याउलट दुसरीच 15 एकर जागा ज्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा टीडीआर (जागा हस्तांतर हक्क) द्यावा लागेल, ती जागा सद्यस्थितीत ताब्यात घेण्यात सर्वांना रस असल्याचे दिसून येत आहे. कारण त्यात कोट्यवधी रुपयांचा टीडीआर (जागा हस्तांतर हक्क) कोणाच्या तरी फायद्यासाठी द्यावा लागणार आहे. लोहगाव विमानतळावरून प्रवास करणार्‍यांची संख्या कैक पटीने वाढलेली असताना कोणत्याही लोकप्रतिनिधींना या बाबतची गंभीरता दिसून आलेली नाही व सदर घोषित जमिनीची कायदेशीर प्रक्रिया दोन वर्षानंतरसुद्धा प्रलंबित आहे. 

पुणे येथील लोहगाव विमानतळावर गेल्या दोन वषार्र्ंत प्रवाशांच्या संख्येत तीस ते पस्तीस टक्क्यांची वाढ झाल्याचे व विमानांच्या उतरण्याच्या व उड्डाणांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्यामुळे, अस्तित्वात असलेल्या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी तूर्त 15.84 एकर जागा भाडेतत्त्वावर देण्याची घोषणा, त्यावेळचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केली होती. त्यावेळी पर्रीकर पुढे असेही म्हणाले की, भविष्यात प्रवाशांच्या संख्येत आणखी तीस ते चाळीस टक्के वाढ झाली तरीही सध्याचे विमानतळ पुरेसे पडू शकेल, त्याकरिता सदर जागा ताब्यात घेण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यापूर्वीच कामकाजाला सुरुवात करण्यात येईल.

याचबरोबर विमानतळाच्या दुसर्‍या टप्प्याचाही विकास करावा लागेल व विमानतळा कडून शहरात जाणार्‍या वहातुकीची कोंडी कमी व्हावी, यासाठी तेथील रस्ता रुंदीकरणासही तत्त्वतः मान्यता देण्यात आली होती. याच बैठकीमध्ये 15.84 एकर जागा व रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता करावी, अशी सूचना पर्रीकरांनी सर्व  संबंधितांना दिल्या होत्या. 

हवाई दल, विमानतळ प्राधिकरण, महानगरपालिका यांच्यामध्ये योग्य समन्वय नसल्यामुळे दोन वर्षानंतरही परिस्थीती ‘जैसे थे’ असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तसेच सर्वच लोकप्रतिनिधींची अनास्था याकरिता कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. लोहगाव विमानतळाचा वापर हा सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, पुणे जिल्ह्यातील व पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरातील लाखो नागरिक रोज करत असतात. यामध्ये सत्ताधारी पक्षाचे  केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासहित शहर व जिल्ह्यातील चार खासदार, राज्य सरकारमधील दोन मंत्री, दिलीप कांबळे व गिरीश बापट आहेत. राज्याच्या विधानसभेत पुणे शहरातील सर्व 8 आमदार आहेत, पुणे व पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेत सत्ताधारी पक्ष एक वर्षापासून सत्तेत असताना या महत्त्वाच्या विषयाकरिता दोन वर्षानंतर कोणासही वेळ नसल्याचेही आढळून आले आहे. दोन वर्षानंतरसुद्धा लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण रखडले असल्याचे दिसून येते व याचा त्रास लाखो प्रवासी भोगत आहेत.

Tags : pune, pune news, Government, fails, take, over, air force base