Sat, Mar 23, 2019 16:08होमपेज › Pune › धनगर समाजाची सरकारने फसवणूक केली : प्रकाश शेंडगे

धनगर समाजाची सरकारने फसवणूक केली : प्रकाश शेंडगे

Published On: Jul 31 2018 3:37PM | Last Updated: Jul 31 2018 3:37PMपुणे : प्रतिनिधी 

धनगर समाजाचा उल्लेख ­धनगड झाल्याने राज्यातील धनगर समाज स्वातंत्र्या­पासून एसटी आरक्षणापासून वंचित आहे. त्यामुळे समाज उद्ध्व‍स्त झाला आहे. समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्व पुरावे देण्यात आले. विद्यमान मुख्यमंत्र्यांनी समाजाला सरकार आल्यानंतर पहिल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत धनगर आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, आतापर्यंत अडीचशे पेक्षा जास्त मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या.तरीही त्यामध्ये धनगर आरक्षणाचा साधा ध शब्दही काढला नाही. सरकारने धनगर समाजाची फसवणूक केली असून त्याविरोधात राज्यभऱातील धनगर समाज उद्यापासून  रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी यावेळी दिला. 

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी राज्यभरातील समाज नेत्यांची बैठक मंगळवारी पुण्यात आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी आमदार प्रकाश शेडगे, माजी मंत्री अण्णा डांगे, आमदार रामहरी रूपनवर, आमदार राम वडकूते, आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकते यांच्यासह राज्यभरातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

धनगड ऐवजी धनगर अशी दुरुस्ती करण्यासाठी आतापर्यंत वेगवेगळ्या सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतु, कोणत्याही सरकारने धनगरांना न्याय दिला नाही. विद्यमान सरकारने आरक्षणाचे आश्‍वासन देऊन गेली चार वर्षे फक्त वेळकाढूपणा केला असल्याचा आरोप यावेळी शेंडगे यांनी केला. सरकारने धनगरांची फसवणूक केल्याने आंदोलनाशिवाय पर्याय राहिला नसून उद्यापासून राज्यभरात धनगर समाजाकडून आरक्षणासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. 

धनगर समाजाच्या वतीने केंद्र सरकार व राज्य सरकारला धनगड आणि धनगर एकच असल्याचे अनेक पुरावे आजवर देण्यात आले आहेत. केंद्र सरकार हे मान्य करत, पण राज्य सरकारला ते मान्य नाही. धनगर समाजाच्या स्थितीवर अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या टाटा सोशल सायन्सचा अहवाल कोर्टात टिकणार नाही. त्यामुळे सरकारला आरक्षणासाठी वेळ देण्यास समाज तयार नसून राज्यात धनगर समाजाचे होणारे आंदोलन हे उग्र असेल, त्यामुळे निर्माण होणार्‍या कायदा सुव्यस्थेची जबाबदारी सरकारची असेल, असेही यावेळी शेंडगे यांनी सांगितले.