Tue, Jul 23, 2019 19:24होमपेज › Pune › विविध संस्थांचा शासन व प्रशासनावर अंकुश

विविध संस्थांचा शासन व प्रशासनावर अंकुश

Published On: May 15 2018 1:32AM | Last Updated: May 14 2018 11:45PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमधील विविध सामाजिक संस्था शासन आणि प्रशासनाला त्यांच्या कामाबद्दल जाब विचारून त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचे काम करत आहेत. त्यामुळे शहरातील कर भरणार्‍या नागरिकांचा पैसा योग्य कामासाठी वापरला जात आहे, असे प्रतिपादन खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले.पिंपरी चिंचवड सिटिझन्स फोरम (पीसीसीएफ) च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमनिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. चिंचवडमधील सायन्स पार्क येथील सभागृहात  हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी खा. बारणे बोलत होते. याप्रसंगी  उपमहापौर शैलजा मोरे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे, चंद्रकांत कुलकर्णी, प्रभाकर बोकील, चापेकर समितीचे विश्वस्त रवींद्र नामदे आदी उपस्थित होते.

‘प्राईड ऑफ पिंपरी-चिंचवड’ हा पहिला पुरस्कार महिलांच्या मासिक पाळीबाबत जनजागृतीचे काम करणार्‍या प्रवीण निकम या तरुणाला देण्यात आला. निकम यांनी मासिक पाळीबाबत समाजाच्या सर्वस्तरात जागृती केली आहे. त्यांच्या कामाची दखल आंतराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. सन 2016 मध्ये त्यांना राष्ट्रीय युवा सन्मान, तसेच युनायटेड नेशन्सचे जागतिक युवा अँबेसिडर म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.सामाजिक कार्यात अग्रेसर एक सामाजिक संस्था आणि एक गृहनिर्माण सोसायटीला ‘सामाजिक कार्यगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. सामाजिक संस्थांमधून हा पुरस्कार जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम हे अभियान राबवून नदी स्वच्छतेचा संदेश देणार्‍या रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी या संस्थेला तर, गृह निर्माण सोसायट्यांमधून हा पुरस्कार पाणी बचतीसाठी पुढाकार घेणार्‍या रावेतमधील सेलेस्टीयल सोसायटीला प्रदान करण्यात आला. खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ठेकेदारांना पोसण्याच्या धोरणाला विरोध करून प्रत्यक्षात होत असलेल्या कामांना सहकार्य केले पाहिजे. पीसीसीएफने उभारलेले निगडीपर्यंत मेट्रोचे जनआंदोलन सरकारला जाग आणणारे आहे. प्रत्येक कामासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. पुरस्काराला उत्तर देताना प्रवीण निकम म्हणाले की, सगळीच कामे संघर्ष करून पूर्ण होत नाहीत, बरीच कामे चांगल्या चर्चांमधून सुद्धा पूर्ण होतात. लक्ष्मीकांत भावसार यांनी सूत्रसंचालन केले. सूर्यकांत मुथीयान यांनी आभार व्यक्त केले.