Thu, Apr 25, 2019 21:29होमपेज › Pune › शत्रूही बाबांबद्दल चांगले बोलतात, हाच त्यांचा गौरव : पंकजा मुंडे

शत्रूही बाबांबद्दल चांगले बोलतात, हाच त्यांचा गौरव : पंकजा मुंडे

Published On: Feb 04 2018 11:21AM | Last Updated: Feb 04 2018 11:30AMपिंपरी : प्रतिनिधी

महाविद्यालयाच्या ‘सीआर’च्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे सलग तीन वेळा पराभूत झाले. युती केल्यास प्रस्थापितांना पराभूत करता येईल, अशी कल्पना प्रमोद महाजन यांनी मांडली. त्यानुसार युती करून त्यांनी निवडणूक लढवत जिंकली. त्या निवडणुकीपासून मुंडे व महाजन यांनी युतीची मुहूर्तमेढ रोवली, असे प्रतिपादन ग्रामविकास, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

दिवगंत माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त ‘आठवणीतील मुंडेसाहेब’ या विषयावर रहाटणी येथे शनिवारी (दि.3) झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शिवसेनेचे 2019 ची लोकसभा व विधानभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे जाहीर केले आहे. या पार्श्‍वभूमीवर पंकजा मुंडे यांनी सदर आठवणीस उजाळा दिला. भाजपा व शिवसेना युतीचे महत्त्वाचे शिलेदार असलेले मुंडे नसल्याने ही दोन्ही पक्षांत दरी निर्माण झाल्याचे या वक्तव्यावरून स्पष्ट होते.

या वेळी महापौर नितीन काळजे, पुण्याचे महापौर डॉ. मुक्ता टिळक, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, डॉ. अमित पालवे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष गोविंद केंद्रे, संघटन मंत्री सुनील कर्जतकर, अ‍ॅड. सचिन पटवर्धन, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, उपमहापौर शैलजा मोरे, उमा खापरे, सीमा सावळे आदी उपस्थित होते.

पंकजा मुंडे यांनी वडील गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी सांगताना, शिस्तप्रिय पिता, आई, मित्र, गुरू आदी नातेसंबंधांवर भाष्य केले. त्यासंदर्भात अनेक घटनांना उजाळा दिल्या. त्या म्हणाल्या की, माझे दीड वर्षाचे बाळ असताना मला त्यांनी त्यांच्या 2009 च्या विधानसभा निवडणुकीचे प्रचारप्रमुख नेमले. माझ्या खांद्यावर अनेक जबाबदार्‍या टाकत सक्षम करीत मला घडविले. त्यामुळे त्यातील अनेक गुण माझ्यात आहेत. विरोधक त्यांचे नाव घेऊन मला घेरतात, त्या वेळी बाबांच्या खर्‍या शक्तीची प्रचिती येते. मित्रांसह शत्रूही त्यांच्याबद्दल जाहीरपणे चांगले बोलतात, हा त्यांचा गौरव आहे. आज चौथ्या वर्षीही त्यांची जयंती महाराष्ट्रासह देशभरात साजरी केली जात आहे. त्यामुळे ते खर्‍या अर्थाने लोकनेते आहेत. त्यांनी सांगितलेले काम पूर्ण करण्याचा ध्यास मी घेतला असून, ते पूर्ण करण्यास कटिबद्ध असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

खासदार साबळे म्हणाले की, मुंडे यांचा बीडच्या प्रचारप्रमुख म्हणून 15 वर्षे संधी मिळाली. प्रचारातील आर्थिक बाजूचा हिशेब त्यांनी कधीच मागितला नाही. हा एका सामान्य कार्यकर्त्यावर टाकलेला विश्‍वास खूप मोठा आहे. गोविंद कोंद्रे यांनी मुंडे यांना सर्कसची रिंग मास्टर अशी उपमा दिली. त्यांनी हत्ती, घोडा, कुत्रा, गाढव असे अनेकांना त्यांच्या लायकीप्रमाणे काम देऊन ते करून घेतले आणि त्यांना मोठे केले; मात्र काहींना आपण मोठे झाल्याचेm वाटत असल्याची टीका त्यांनी धनजंय मुंडे यांचे नाव न घेता केली. कार्यक्रमात महापौर काळजे, महापौर टिळक व आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंती उंबर्गीकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यकर्त्यांवरील अन्याय दूर करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीनंतर पक्षातील काही कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे‘ तो दूर करावा. पिंपरी-चिंचवड शहराकडे जास्त लक्ष द्यावे, अशी मागणी कार्यक्रमाचे संयोजक सदाशिव खाडे यांनी व्यक्त केली. घार जशी आपल्या पिल्ल्यावर लक्ष ठेवते, त्याप्रमाणे पंकजा मुंडे यांचे शहरावर लक्ष असून, त्या कोणावर अन्याय होऊ देणार नाहीत. त्या समर्थपणे नेतृत्व करीत आहेत, असे अ‍ॅड. सचिन पटवर्धन म्हणाले.