Tue, Apr 23, 2019 19:33होमपेज › Pune › बसगाड्या उदंड; थांब्यांवरील निवारा शेड गायब

बसगाड्या उदंड; थांब्यांवरील निवारा शेड गायब

Published On: Jun 11 2018 1:07AM | Last Updated: Jun 11 2018 12:10AMदेहूरोड : उमेश ओव्हाळ

मावळ तालुक्याला पुणे आणि पिंपरी-चिंचवड या मोठ्या शहरांशी जोडणारी महत्वाची जीवनदायिनी ठरलेली पीएमपी सेवा सध्या नवीन बसगाड्यांमुळे पुन्हा चांगल्या फॉर्मात आहे;  मात्र पाच वर्षापूर्वी रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी काढून टाकण्यात आलेल्या बसथांब्याच्या निवारा शेडअभावी प्रवाशांचे मात्र सर्व ऋतूत हाल सुरू आहेत.

सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत लोहमार्गानंतर सर्वाधिक प्रभावी ठरलेले माध्यम म्हणजे स्थानिक बससेवा. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांतुन आसपासच्या ग्रामीण भागाला जोडण्यासाठी स्थानिक बससेवा म्हणून गेली अनेक वर्षे पीएमपीएमएल ही सार्वजनिक प्रवासी सेवा चोख कामगिरी बजावताना दिसते. 1976 च्या सुमारास पुणे मनपा ते देहूरोड काकडे हॉटेल ही पहिली बसगाडी पुणे-मुंबई महामार्गावर धावली आणि तेव्हापासून लाखो प्रवाशांच्या गळ्यातील ताईत बनली. आज सुमारे पाच दशकानंतरही या सेवेची मोहिनी प्रवाशांच्या मनावर कायम आहे. 

पूर्वीची पीएमटी आणि पीसीएमटी यांचे विलीनीकरण होऊन काही वर्षांपुर्वी पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित (पीएमपीएमएल)अस्तित्वात आले. महामंडळाने या मार्गावर लोकाभिमुख सेवेसाठी अनेक प्रयोग केले. नवीन प्रदुषणमुक्त बसगाड्या (मिडीबस) हा त्यातील अगदी अलिकडचा प्रभावी प्रयोग म्हणता येईल. या बसगाड्यांमुळे महामार्गावरील प्रवास पुर्वीपेक्षा आरामदायक झाला आहे. या मार्गावर कामशेत व सईनगर हे नवे बसमार्गही सुरू झाल्याने प्रवासी संख्या वाढीस मदत झाली आहे. 

असे असले तरी केवळ बसगाड्या वाढल्या अन्य सुविधांचे काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. देहूरोड ते निगडी या सुमारे सव्वा सहा किलोमीटर अंतरात महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी चार वर्षांपुर्वी महामार्गालगत अतिक्रमण कारवाई करण्यात आली. या कारवाईत निगडी ते देहूरोड दरम्यानचे सुमारे 11 निवारे शेडचा बळी गेला. कारवाई करणार्‍या संबंधित कंपनीने हे शेड उचलून नेले, ते आजतागायत परत केले नाहीत. याबाबत काही बसप्रवासी संघटनांनी बसथांबे व निवारा शेड पुर्ववत उभारण्याची वारंवार मागणी केली. मात्र, पाच वर्षे होत आली तरी त्यावर प्रशासनाला विचार रायला वेळ मिळेना.

निगडी ते देहूरोड दरम्यान केंद्रीय विद्यालय, अलकापुरी, देहू फाटा, बँक ऑफ इंडिया, देहूरोड बाजार, गुरूद्वारा, सेंट ज्युड हायस्कुल, सेंट्रल हॉटेल, कृष्ण मंदिर, शेलावाडी फाटा, शंकरवाडी आणि सोमाटणे फाटा हे महत्वाचे बसथांबे असून यातील सेंट ज्युड आणि केंद्रीय विद्यालय या दोन बसथांब्यांवर विद्यर्थ्यांची अधिक वर्दळ असते. हे सर्व बसथांबे आजमितीस सुरू आहेत, पण त्याठिकाणी निवारा शेड अभावी प्रवाशांची आबाळ सुरू आहे. उन्हाळ्यात घामाच्या धारांनी भिजत प्रवाशांनी या थांब्यांवर बसची प्रतिक्षा केली. आता पावसाळ्यात पावसाच्या सरीत भिजत प्रतिक्षा करावी लागणार आहे.