Thu, Jul 18, 2019 02:55होमपेज › Pune › १७ लाखांचे सोने पकडले

१७ लाखांचे सोने पकडले

Published On: Mar 22 2018 1:45AM | Last Updated: Mar 22 2018 1:13AMपुणे : प्रतिनिधी
हेअर बँड, क्‍लिप आणि कीज चेनमध्ये दुबईहून तस्करीसाठी सोने घेऊन आलेल्याला सीमा शुल्क (कस्टम) विभागाने लोहगाव विमानतळावर पकडले. तो मुंबईचा असून, ही कारवाई बुधवारी पहाटे करण्यात आली. त्याच्याकडून 17 लाख 57 हजार रुपये किमतीचे 566 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. 

मोहम्मद इरफान शेख (रा. तुर्भे, मुंबई) असे पकडण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शेख दुबईहून स्पाईस जेटच्या विमानाने बुधवारी पहाटे  लोहगाव विमानतळावर उतरला होता. तो ग्रीन चॅनलमधून जात असताना सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त भारत नवले यांच्या पथकाला संशय आला. त्यांनी शेखला बाजूला घेतले व चौकशी केली. त्याच्याकडे असणारे साहित्यही तपासण्यात आले. त्यात केसांच्या क्लिप, बँड, चावीची चेन आढळून आली. त्याची तपासणी केली असता त्यात सोने लपवून आणल्याचे समोर आले. अधिकार्‍यांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने दुबईहून हे सोने घेऊन आल्याचे सांगितले. त्याच्याकडून 17 लाख 57 हजार रुपयांचे 566 ग्रॅम सोने जप्त केले आहे. त्यानुसार कस्टम अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. 

सोने तस्करीची ही नवीन पद्धत 

यापूर्वी सीमा शुल्क विभागाने पकडलेल्या तस्करांकडून सोने घेऊन येण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढविली जात असल्याचे समोर आले आहे. मात्र, बुधवारी शेख याला पकडून केलेल्या कारवाईत त्याने सोने तस्करीसाठी वापरलेली पद्धत प्रथम समोर आली आहे. दरम्यान, त्याचा फक्त सोने वाहतूक करण्यासाठी वापर केला जात होता. त्यासाठी एक विशिष्ट रक्‍कम त्याला देण्यात आली होती. तो कोणाच्या सांगण्यावरून सोने घेऊन आला, तो कोणाला देणार होता याचा तपास सुरू आहे.

 

Tags : Pune, Pune News, crime, Lohagaon airport, Gold,