Mon, Mar 25, 2019 03:04
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › सोन्याचे दर वर्षभर चढे राहणे शक्य 

सोन्याचे दर वर्षभर चढे राहणे शक्य 

Published On: Apr 18 2018 1:41AM | Last Updated: Apr 18 2018 12:35AMपुणे : अस्थिर शेअर बाजार आणि चलन वाढीचा दबाव यांमुळे सोन्याच्या किंमती यावर्षी चढ्या राहण्याची शक्यता आहे. तथापि, अक्षय्यतृतीयेला मात्र किंमतीत फार मोठा फरक असणार नाही. तज्ज्ञांच्या मते, पुढील अक्षय्य तृतीयेपर्यंत सोन्याचे प्रति 10 ग्रॅम दर 29 हजार 800 ते 33  हजार रुपये या किंमतपट्ट्यात राहण्याची शक्यता आहे. 

जानेवारी ते मार्च दरम्यान सोन्याची आयात 160 टन एवढी होती. मागच्या वर्षीच्या तुलनेत ते प्रमाण 35 टक्क्यांनी कमी होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोन्याच्या दराचे पडसाद भारतीय बाजारपेठेवर दिसून येतात. त्यामुळे यात अस्थिरता अपरिहार्य आहे. मात्र दर हे साधारणपणे चढेच असतील अशी धारणा आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्ध, ट्रम्प प्रशासनाच्या संबंधातील काही निर्णयाबाबतची चिंता आणि भौगोलिक राजकीय तणाव निर्माण करणारे घटक यांमुळे हे दर वाढते राहतील, असे सांगितले जाते.  

अमेरिका आणि चीनने परस्परांच्या आयात मालावर जबर कर लावण्याचा इशारा दिवला आहे. हे प्रत्यक्षात आले तर त्याचे गंभीर आर्थिक परिणाम संभवतात. अमेरिका आणि रशिया सिरियाच्या प्रश्‍नांवरुन  एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. इराणबरोबरचा 2015 चा जो आण्विक करार केला त्यातून बाहेर पडण्याची धमकी अमेरिकेने दिलेली आहे. पुढील महिन्यांमध्ये अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यामध्ये अण्वस्त्रांचा धोका कमी करण्याबाबत पुढील महिन्यात चर्चा होत आहे. या सर्व भौगोलिक, राजकीय कारणांमुळे सोन्याला चांगले दिवस आहेत, असे म्हणायला वाव आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक अर्थव्यवस्थेबाबत आशावादी असून त्यामुळे सोन्याच्या दरवाढीला वाव असल्याचे सांगितले जाते. पुढील अक्षय्य तृतीयेपर्यंत हे दर 1 हजार 260 औस ते 1 हजार 420 औंस या किंमत पट्ट्यात राहतील. तर देशामध्ये हे दर प्रति दहा ग्रॅम 29 हजार 800 ते 33 हजार किंमत पट्ट्यात राहतील, असा अंदाज आहे. 

सोन्याच्या दरांबाबत तज्ज्ञांमध्ये उलटसुलट मते व्यक्त होत आहेत. कोटक महिंद्र बँकेचे ग्लोबल ट्रॅन्झॅक्शनचे (बँकिंग आणि प्रेशस मेटल) बिझनेस हेड शेखर भंडारी यासंदर्भात बोलताना म्हणाले, सध्या जगभरात जे भौगोलिक आणि राजकीय तणावाचे वातावरण आहे, त्याचा सोन्याच्या दरावर फारच कमी परिणाम होऊ शकतो. ते खूपच तीव्र झाले तर मात्र परिस्थिती बदलू शकते. एक-दोन दिवसांपुरती सोन्याच्या किंमतींमध्ये किरकोळ वाढ होण्याची शक्यता आहे, परंतु ती फार काळ टिकणार नाही. भारतीय ग्राहकही दरांबाबत बारकाईने लक्ष ठेवतील. अल्प कालावधीचा विचार करता, सातत्याने भाववाढ दृष्टीपथात दिसत नाहीत. निदान पुढच्या 40 दिवसांत तरी अशीच स्थिती राहील, असे सोने व्यापारातील विश्‍लेषक भार्गव वैद्य यांनी सांगितले. 

सोन्याची नाणी आणि बार्स यालाही फारसा प्रतिसाद मिळण्याची शक्यता तज्ज्ञांना कमी वाटते. गेल्या वर्षीच्या अक्षय्य तृतीयेच्या तुलनेत सोन्याच्या किंमतीमध्ये अंदाजे 7 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. गेल्या वर्षी हा दर प्रति 10 ग्रॅम 28 हजार 800 रुपये होता तो आता 31 हजार 800 च्या घरात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा प्रति ट्रॉय औन्स गेल्या वर्षी 1 हजार 265 डॉलर्स प्रति औंस होता. तो आता 1 हजार 40 डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. 

Tags : Pune, Gold, prices, can,  high, every, year