Thu, Jun 20, 2019 02:08होमपेज › Pune › जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन : आत्महत्या रोखण्यासाठी जनजागृतीची गरज 

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन : आत्महत्या रोखण्यासाठी जनजागृतीची गरज 

Published On: Sep 10 2018 1:17AM | Last Updated: Sep 09 2018 11:50PMपिंपरी : पूनम पाटील

नैराश्य, ताणतणाव, आजारपण, एक्स्ट्रा मॅरीटल अफेअर्स, प्रेमाची व्याख्या समजण्याआधीच झालेला ब्रेकअप, स्पर्धेची किंवा परिक्षेची भीती अशा मानसिक आरोग्याशी निगडित असलेल्या अनेक गोष्टी आत्महत्येसाठी कारणीभूत ठरतात. जगभरात आत्महत्येचे प्रमाण  वाढत असून शहरातही गेल्या काही काळांत विविध कारणांमुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. आत्महत्या रोखण्यासाठी शहरात व्यापक स्तरावर प्रयत्न होतांना दिसत नाहीत. त्यामुळे हे प्रमाण रोखण्यासाठी आत्महत्येसंदर्भात  एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, असे मत शहरातील मानसोपचार तज्ज्ञ व समुपदेशकांनी व्यक्त केले आहे. 

10 सप्टेंबर या ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन’च्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने वर्कींग टूगेदर टू प्रिव्हेन्ट सुसाईड या संकल्पनेनुसार यावर्षी काम करण्याचे ठरवले आहे. गेल्या काही काळात शहरातही विद्यार्थ्यांपासून ते विवाहित व्यक्तींच्या आत्महत्या करणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. 

आत्महत्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता व्यापक स्तरावर काम करण्याची गरज आहे. मात्र हे प्रयत्न सध्या अपुरे पडत आहेत. गेल्या काही दिवसात 13 ते 30 वयोगटात आत्महत्या करणार्याचे प्रमाण वाढल्याची चिंता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. शहरातही यावर्षी पालकांनी मोबाईल दिला नाही म्हणून, शाळेत बसू दिले नाही तसेच आई रागावली अशा क्षुल्लक कारणांमुळे विद्यार्थी दशेतील मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. 12 ते 18 वयोगटातील मुले सारासार विचार न करता मृत्यूला आपलेसे करत आहेत. 

छोट्या कारणांनी अगदी टोकाचा विचार करणार्‍या पिढीला आज खरोखरच मार्गदर्शनाची व समजून घेण्याची गरज असल्याने अभ्यासपध्दतीत माणूस म्हणून जगावे कसे याचे शिक्षण देण्याचे आवाहन शहरातील मानसोपचार तज्ज्ञांनी केले आहे. 

आत्महत्या रोखण्यासाठी चांगले मित्र हे थेरपीचे काम करतात

सगळ्या गोष्टींचे शिक्षण दिले जाते, परंतु जगायचे कसे हे शिक्षण दिले जात नाही. स्पर्धेत अपयश आले तर ते पचवायचे कसे याचे शिक्षण दिले जात नाही. स्पर्धेमुळे माणसाने स्वतःचेच जीवन अवघड करून घेतले आहे. मनाने आजारी असतो, तेव्हा एकाकीपणा दूर करण्यासाठी मित्रांची गरज आहे. कुणीही झोपेतून उठून आत्महत्या करत नाही. तर हे चक्र आधीपासून सुरू झालेले असते. आत्महत्या केलेल्या केसेस बघितल्या तर आत्महत्या करण्यापूर्वी आत्महत्या करणार्‍या व्यक्तीने व्यवस्थित जेवण केलेले असते. वरकरणी हा शांत दिसतो, परंतु सर्व बाहेर गेल्यावर हा आत्महत्या करतो.  याकामी चांगले मित्र हे थेरपीचे काम करतात. आजवर अडीचशेहून अधिक तणावग्रस्त व्यक्तींना आत्महत्या करण्यापासून रोखले आहे. योग्य समुपदेशन केल्याने अशा व्यक्तीचे आयुष्य व्यवस्थित मार्गी लागते.     -डॉ. सीमा निकम, समुपदेशक, (ताण व्यवस्थापन व नैराश्य अभ्यासक)

आयुष्यात येणार्‍या आव्हानांना सामोरे जावे, आयुष्याकडे एक संधी म्हणून बघा, आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी आहेत, ज्यांची आपल्याला माहिती नाही. त्यांची माहिती करून घ्यायची आहे. नकारात्मक गोष्टीऐवजी सकारात्मक गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्याला जो जन्म मिळाला आहे, त्याच्याशी अनेक नाती जोडलेली आहेत. त्यामुळे आपले आयुष्य हे स्वतःपुरते मर्यादित नाही तर ते इतरांशीही महत्त्वाचे आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आयुष्यात पुढे जावे.     - डॉ. राम गुडगिला, जीवनकौशल्य प्रशिक्षक.