Mon, Jun 24, 2019 21:00होमपेज › Pune › खुलाशाबाबतचे अधिकार ’लेखा परीक्षण’कडे द्या

खुलाशाबाबतचे अधिकार ’लेखा परीक्षण’कडे द्या

Published On: Feb 18 2018 2:01AM | Last Updated: Feb 17 2018 11:56PMमुंढवा : नितीन वाबळे 

ग्रामपंचायतीचा लेखा परीक्षणाच्या अहवालातील त्रुटींचे खुलासे मागविण्याचे अधिकार लेखा परीक्षण विभागाकडेच द्यावेत. त्रुटींचा खुलासा वेळीच मिळत नसल्याने दुसर्‍या वर्षीचा अहवाल बनविताना लेखा परीक्षण विभागाला अडचणी येत आहेत. हे थाबंविण्यासाठी जिल्हा परिषदेकडून त्रुटींचे खुलासे वेळीच आले पाहिजेत. तसे होत नसेल, तर शासनाने ग्रामपंचायतीच्या अहवालातील खुलासे मागविण्याचे सर्वाधिकार लेखा परीक्षण विभागालाच द्यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीचा वार्षिक जमाखर्चाचा तपशील त्या जिल्ह्याच्या लेखा परीक्षण विभागाकडे सादर केला जातो. त्यानंतर लेखा परीक्षण विभागाकडून त्याचा अहवाल जिल्हा परिषद, संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी व ग्रामपंचायतीकडे पाठविला जातो. जिल्हा परिषदेकडून त्रुटींचा खुलासा लेखा परीक्षण विभागाकडे येण्यास विलंब लागतो, तर काही वेळा येत नाही, त्यामुळे कामात विस्कळीतपणा येत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतीचा जमाखर्चातील त्रुटींचे खुलासे मागविण्याचे काम थेट लेखा परीक्षण विभागाकडेच देऊन कामकाज सुरळीत करण्यासाठी प्रशासनने नियमात बदल करणे गरजेचे आहे.

जिल्हा परिषदेकडून लेखा परीक्षणाच्या अहवालाचा खुलासा वेळेत होत नाही. त्यामुळे पुढील वर्षाचा अहवाल बनविताना मागिल वर्षाच्या अहवालातील त्रुटींच्या खुलाशांचा संदर्भ लेखा परीक्षण विभागुला मिळत नाही. खुलासे मिळत नसतील, तर ते  कशासाठी मागविले जातात, असा प्रश्‍न या निमित्ताने पुढे आला आहे. वास्तविक अहवालातील त्रुटींच्या खुलाशांची एक प्रत लेखा परीक्षण विभागाकडे येणे आवश्यक आहे. मात्र, खुलासांची प्रत मिळत नसल्याने  त्रुटींचा खुलासा मिळाला नाही, असा उल्लेख लेखा परीक्षण विभागाकडून अहवालामध्ये केला जातो. 

केशवनगर ग्रापमंचायतीच्या 2014-15 च्या लेखा परीक्षण अहवालात त्रुटींचा खुलाशाविषयी हवेली पंचायत समितीच्या अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता, हा प्रशासकीय कामकाजाचा भाग आहे, असे सांगून उत्तर देण्यास टाळाटाळ केली. दोन वर्षांचा कालावधी होऊनही त्रुटींचे खुलासा का होत नाहीत. त्याला जबाबदार असणार्‍यांवरच आता कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.