Tue, Jul 16, 2019 22:27होमपेज › Pune › प्लास्टिकला सक्षम पर्याय द्या

प्लास्टिकला सक्षम पर्याय द्या

Published On: Jun 26 2018 1:15AM | Last Updated: Jun 26 2018 12:43AMपुणे : प्रतिनिधी

राज्यात संपूर्ण प्लास्टिकबंदी केल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने शहरात सुरू केलेल्या दंडात्मक कारवाईला विरोध करण्यासाठी शहरातील व्यापार्‍यांनी सोमवारी महापालिकेसमोर तीव्र आंदोलन केले. प्रथम प्लास्टिकला सक्षम पर्याय उपलब्ध करून द्या, मगच दंडात्मक कारवाई करा, अशी मागणी करत, कारवाई सुरू ठेवल्यास बेमुदत बंद पुकारण्याचा इशाराही त्यांनी दिला.

महापालिका प्रशासनाने शनिवारी आणि रविवारी शहरात मोहीम राबवित कारवाई केली. या कारवाईविरोधात व्यापार्‍यांनी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला होता. राज्य शासनाने यानिमित्ताने पालिका अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या हातात कोलित दिल्याचा आरोप व्यापार्‍यांनी केला. लहान व्यापार्‍यांना आणि नागरिकांना वेठीस धरू नका, प्लास्टिकबंदी हवी; मात्र जाचक अटी नकोत, असे फलक यावेळी फडकावण्यात आले. या आंदोलनात कापड, किराणा, खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यासह विविध व्यावसायिक सहभागी झाले होते.   

आश्‍वासनानंतर आंदोलन स्थगित

महापालिका प्रशासनाने चुकीची कारवाई यापुढे होणार नाही, असे स्पष्ट आश्वासन दिले आहे. त्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. परंतु पुन्हा चुकीची कारवाई झाल्यास आंदोलन तीव्र केले जईल, असा इशारा पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिला.पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ आणि मिठाई व फरसाण संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, महापालिका आयुक्त सौरभ राव आदींची भेट घेऊन, व्यापार्‍यांवर होत असलेल्या हुकूमशाही व चुकीच्या कारवाईबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. यावेळी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, पुणे व्यापारी संघाचे उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, सोमाराम राठोड, नवनाथ सोमसे, सारंग राडकर, सुनील गेहलोत, अशोक साळेकर, रवींद्र सारुक आदी पदाधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री बापट यांनी याविषयी बुधवारच्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे विषय मांडतो, असे आश्वासन दिले. तर महापौर मुक्ता टिळक व महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी, यापुढे व्यापार्‍यांवर चुकीची कारवाई होणार नाही याची काळजी घेतली जाईल व संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे निवंगुणे यांनी सांगितले.

योग्य उपाययोजना हवी

प्लास्टिक बंदीमुळे पथारी धारक स्टॉलधारक आणि छोटे विक्रेते यांना अडचण निर्माण झाली आहे. सरकारने योग्य उपाय योजनेनंतर प्लास्टिक बंदी लागू करावी अशी मागणी पथारी हातगाडी पंचायत नेते बाबा कांबळे यांनी केली आहे. शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पथारी हातगाडी पंचायत पुणे शहर अध्यक्ष राजू पोटे, कार्याध्यक्ष डॅनियल लांडगे, नितीन शिंदे, उत्तरेश्वर कांबळे, आनंद तांबे, किरण भालेराव उपस्थित होते.