Sat, Mar 23, 2019 16:06होमपेज › Pune › कचरा द्या अन् ४५ हजार रुपये मिळवा

कचरा द्या अन् ४५ हजार रुपये मिळवा

Published On: Apr 24 2018 1:40AM | Last Updated: Apr 24 2018 1:08AMपिंपरी : प्रतिनिधी

महापालिकेने शहरातील सोसायट्यांना शंभर किलोवरील कचरा घेणार नसल्याचे सांगितले आहे. शंभर किलोवरील कचरा सोसायटीमध्येच जिरविण्याच्या सूचना महापालिकेच्या वतीने करण्यात आल्यामुळे नागरिकांचे अक्षरशः धाबे दणाणले होते. यावर मात्र, संत गाडगेबाबा स्वयंरोजगार संस्थेने पर्यायी उपाय काढल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.   सोसायट्यांनी कचरा दिल्यास त्यांना सुमारे 45 हजार रुपये मिळणार आहेत. कचरा द्या, पैसे घ्या असा उपक्रम संत गाडगेबाबा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अरुण वायदंडे यांनी दिली.

केंद्र शासनाच्या अध्यादेशानुसार सोसायटीमधील 100 किलोवरील फक्‍त ओला कचरा घ्यावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. स्वच्छ भारत योजनेअंतर्गत हा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनीही सोसायट्यांना 100 किलो वरील कचरा सोसायट्यांमध्येच जिरविण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सुका व घातक असणार्‍या कचर्‍याचे आम्ही करायचे काय? असा सवाल सोसायटीमधील नागरिक करत आहेत.

यासाठी संत गाडगेबाबा स्वयंरोजगार सहकारी संस्थेने पुढाकार घेतला आहे. कचरा द्या व पैसे घ्या अशी योजना या संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे. संस्थेच्या पुढाकाराने सफाई सेवकांकडून सोसायटीमधील कचरा उचलला जात आहे. यामध्ये संत तुकारामनगर येथील सुखवाणी कॅम्पस हौसिंग सोसायटी, चिंचवड येथील सुखवाणी ब्लीस हाऊसिंग सोसायटी, सुखवाणी सफायर हौसिंग सोसायटी आदी ठिकाणी या उपक्रमाची सुरूवात झाली आहे. शहरातील इतर सोसायट्यांनी प्रतिसाद दिल्यास सुमारे एक हजार बेरोजगारांना रोजगार मिळेल असा दावा, संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे.

सोसायट्यांनी प्रतिसाद दिल्यास मोशी कचरा डेपोवर येणारा ताण कमी होईल, अशी आशा या वेळी संस्थेने व्यक्‍त केली. संस्थेच्या माध्यमातून सुका व घातक कचरा पुननिर्मितीसाठी पाठविला जातो. 
सुका कचरा 300 ते 500 किलो जमल्यास सोसायटीला महिन्याकाठी सुमारे 45 हजार आर्थिक उत्पन्‍न मिळेल, असा दावा संस्थेच्या वतीने करण्यात आला.