Sun, Jul 21, 2019 01:25होमपेज › Pune › विलास लांडे यांना विधानपरिषदेवर संधी द्या 

विलास लांडे यांना विधानपरिषदेवर संधी द्या 

Published On: Jun 19 2018 1:26AM | Last Updated: Jun 19 2018 12:59AMपिंपरी : प्रतिनिधी

शहरातील विविध प्रश्‍नाबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी (दि.18) राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांची शहरातील प्रमुखांच्या शिष्ट मंडळाने भेट घेतली. दरम्यान महापालिका विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि धनंजय भालेकर यांनी पक्षाध्ययक्ष खा. शरद पवार यांच्याकडे विलास लांडे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी यासाठी साकडे घातले. 

पालिकेत सत्ताधारी असणार्‍या भाजपकडून शहराच्या दृष्टीने विकास कामे पुढे सरकत नाहीत.  त्याअनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची पुण्यातील मोेती बागेत माजी आ. विलास लांडे, विरोधी पक्षनेते  दत्ता साने, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक अजित गव्हाणे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नगरसेवक नाना काटे, धनंजय भालेकर यांनी भेट घेतली. भविष्याच्या  राजकारणाच्या दृष्टीने करावयाच्या नियोजनासाठी शरद पवार यांचे शिष्ट मंडळाने मार्गदर्शन घेतले. शिष्ट मंडळाच्या भेटीनंतर दत्ता साने आणि धनंजय भालेकर यांनी खा. पवार यांची स्वतंत्र भेट  घेतली.

शहरामध्ये पालिकेत सत्ता भाजपची, दोन्ही आमदार भाजपचे, खासदार शिवसेनेचे आहेत. त्यांना तोडीस तोड देण्याची क्षमता लांडे यांची आहे. भविष्यातील निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी आणि विरोधी आमदार, खासदारांच्या बरोबरीने शहराचे प्रश्‍न विधान परिषदेत मांडण्यासाठी लांडे यांना  विधान परिषदेसाठी संधी द्यावी असे साकडे घातल्याचे समजते. भविष्याच्या अनुषंगाने राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे संकेत आहेत. त्यामुळे आघाडीच्या वाट्याला येणार्‍या 3 पैकी 2 काँग्रेस आणि 1 राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार असल्याचे समजते. त्यामुळे या जागेवर शरद पवार कोणाच्या नावाला हिरवा कंदील दाखविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लांडे हे शरद पवार यांच्याबरोबर एकनिष्ठतेने असल्यामुळे त्यांना ही संधी मिळू शकते अशी अपेक्षा लांडे समर्थकांना आहे.