Sun, Aug 18, 2019 21:34होमपेज › Pune › मेट्रो : पाचशे मीटरपर्यंत बांधकामासाठी एनओसी द्या

मेट्रो : पाचशे मीटरपर्यंत बांधकामासाठी एनओसी द्या

Published On: Jun 11 2018 12:54AM | Last Updated: Jun 11 2018 12:46AMपुणे : प्रतिनिधी

शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूंनी पाचशे मीटर अंतरावर बांधकामासाठी ‘पीएमआरडीए’कडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेणे बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे. ‘पीएमआरडीए’च्या या मागणीवर महापालिकेने मात्र अद्याप निर्णय घेतलेला नाही.

पुणे महानगर विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) शिवाजीनगर ते हिंजवडी या 31 किमीचा मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहे. शिवाजीनगरवरून गणेश खिंड रोड, पुणे विद्यापीठ, औंध, बाणेर, बालेवाडी मार्गाने पुणे बेंगलोर महामार्गावरून वाकड व पुढे हिंजवडी, असा महामार्ग आहे. एकूण 23 स्टेशन या मार्गावर असणार आहेत. जानेवारी महिन्यात मंत्रिमंडळाने या मार्गावर मंजुरीची मोहोर उमटविल्यानंतर या प्रकल्पाच्या करारनाम्याच्या मसुद्याला आणि तेराशे कोटींच्या संभाव्य तफावत निधीला केंद्राने मार्च महिन्यात मंजुरी दिली आहे.

त्यामुळे आता या प्रकल्पाला गती मिळाली आहे. या ‘मेट्रो’चा बहुतांश भाग हा पुणे महापालिकेच्या हद्दीतून जातो, त्यामुळे या मार्गावर दोन्ही बाजूंनी पाचशे मीटर अंतरापर्यंत बांधकामासाठी तसेच या क्षेत्रात महापालिकेच्या ज्या रिकाम्या जागा व अ‍ॅमेनिटी स्पेस आहेत, त्या विकसित करण्यापूर्वी ‘पीएमआरडीए’ची एनओसी घेणे बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी महापालिका आणि ‘पीएमआरडीए’च्या अधिकार्‍यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी ‘पीएमआरडीए’कडून नुकतीच महापालिका प्रशासनाकडे करण्यात आलेली आहे. या बंधनामुळे औंध, बाणेर, बालेवाडी या भागातील जवळपास ऐंशी टक्के बांधकामांना एनओसी घेण्याची गरज लागू शकणार आहे. 

‘महामेट्रो’कडून फक्त 20 मीटरचे बंधन

महामेट्रो या राज्य शासनाच्या कंपनीकडून शहरातील स्वारगेट ते पिंपरी चिंचवड आणि वनाज-कोथरूड ते रामवाडी या दोन मार्गावर मेट्रोचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, ‘महामेट्रो’कडून या दोन्ही मार्गावर बांधकामाला ‘एनओसी’साठी केवळ वीस मीटरचे बंधन घालण्यात आले आहे. तर मग ‘पीएमआरडीए’कडून पाचशे मीटरची मागणी का केली जात आहे, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.