Mon, May 20, 2019 18:03होमपेज › Pune › रंजनकाका जरा मन मोठं करा!; शेट्टींची भावनिक हाक

रंजनकाका जरा मन मोठं करा!; शेट्टींची भावनिक हाक

Published On: Dec 12 2017 10:34AM | Last Updated: Dec 12 2017 10:34AM

बुकमार्क करा

शिवनगर: वार्ताहर

रंजनकाका जरा मन मोठं करा, ऊस उत्पादक शेतकर्यांना ठरल्यानुसार पहिली उचल एफआरपीपेक्षा अधिकची द्या आणि सभासदांचा ऊस वेळेत गाळा, अशी भावनिक हाक खा. राजू शेट्टी यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांना दिली. खा. शेट्टी यांनी सोमवारी (दि. 11) माळेगाव कारखान्याला भेट दिली. यावेळी खा. शेट्टी यांनी कारखाना कार्यस्थळावर शेतकरी पुतळ्याला पुष्पहार आर्पण करून निळकंठेश्वराला अभिषेक केला.

दरम्यान, खा. शेट्टी यांना अध्यक्ष रंजन तावरे यांनी सांगितले की, माळेगाव कारखान्याने आजपर्यंत शेतकरी सभासदांच्या हिताचाच निर्णय घेतला आहे. त्यानुसार मागील गाळप हंगामात उच्चांकी 3 हजार 100 रुपये दर दिला आहे. मागील सात वर्षांतील गाळप हंगामाचा विचार केला तर तीन-चार हंगामात सभासदांच्या आडसाली उसाचे फेब्रुवारीअखेर गाळप झाले आहे. एका हंगामात मार्च पंधरवड्यापर्यंत गाळप करण्यात आले आहे. यंदादेखील सभासदांच्या आडसाली उसाचे फेब्रवारीअखेरपर्यंत गाळप पूर्ण करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे झालेले आंदोलन हे खासगी साखर कारखान्यांना ऊस मिळावा यासाठी व त्यांच्या नेत्यांना खूष करण्यासाठी केले जात असल्याचा आरोप तावरे यांनी केला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व विरोधी गटाच्या संचालकांनी अध्यक्ष तावरे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत तुम्ही जिल्हा शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष असताना अधिकच्या पहिल्या उचलीसाठी व सभासदांचा ऊस वेळेत गाळप करण्यासाठी आंदोलन करुन उसाच्या गव्हाणीत उड्या मारत होता; मात्र त्या घटनांचा आपल्याला विसर पडला आहे, असा आरोप करत सभासदांच्या उसाचे प्रथम गाळप करुन पहिली उचल एफआरपीपेक्षा अधिकची देण्याची जोरदार मागणी केली. 

नंतर चहा पितो.. 

कारखाना कार्यस्थळावर खा. राजू शेट्टी आले असताना अध्यक्ष रंजन तावरे व सत्ताधारी संचालकांनी त्यांना चहा पिण्यासाठी विनंती केली. मात्र ऊस उत्पादक शेतकर्यांना पहिली उचल ठरल्यानुसार अधिकची द्या त्यानंतर चहा पिण्यास येतो, असे शेट्टींनी नमूद केले.  

घड्याळ व कमळ सारखेच

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिपत्याखालील साखर कारखान्यात आंदोलन होताना दिसत नसल्याचे विचारताच, खा. शेट्टी यांनी केंद्रातील व भाजपचे सरकार शेतकरीविरोधीच आहे. राष्ट्रवादीसुध्दा त्याला अपवाद नसल्याचे सांगत राष्ट्रवादीचे घड्याळ आणि भाजपचे कमळ सारखेच असल्याचा टोला मारला.