Tue, Mar 19, 2019 05:35होमपेज › Pune › ‘बालगंधर्व’ला हेरिटेज वास्तूचा दर्जा द्यावा

‘बालगंधर्व’ला हेरिटेज वास्तूचा दर्जा द्यावा

Published On: Mar 16 2018 1:22AM | Last Updated: Mar 16 2018 12:06AMपुणे : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ नाटककार पु. ल. देशपांडे यांची संकल्पना असलेली वास्तू आणि सांस्कृतिक पुण्याचे माहेरघर असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासावरून शहरात सध्या वादंग सुरू आहे. नाट्यकर्मी, साहित्यिक यांसह बालगंधर्व कर्मचार्‍यांमध्येही असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पक्षनेते, सभागृहनेते, आजी-माजी स्थायी समिती अध्यक्ष यांना बालगंधर्व रंगमंदिर न पाडण्याची मागणी करत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून निवेदन देण्यात आले.

अखिल भारतीय नाट्य परिषद, पुणे शाखेच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासामुळे नाट्यकर्मींना होणार्‍या समस्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. या वेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, श्रीनिवास भणगे, मकरंद टिल्लू, हनुमान मते, रजनी भट व अन्य नाट्यकर्मी उपस्थित होते.

या वेळी नाट्यगृहाच्या पुनर्विकासाबाबत सुरेश देशमुख म्हणाले, बालगंधर्व रंगमंदिराला हेरिटेज वास्तूचा दर्जा द्यावा; तसेच उभ्या असलेल्या रंगमंदिराच्या वास्तूशी आम्हा नाट्यकर्मींच्या नाजूक भावना जडलेल्या आहेत; त्यामुळे ही वास्तू पाडू नये. बालगंधर्व रंगमंदिराच्या वास्तूचा विस्तार होऊ शकतो; त्यामुळे पुनर्विकास करण्याऐवजी वास्तूच्या परिसरात नवनिर्माण करून वास्तूचा विस्तार करावा. 

तसेच नाट्य व्यवसायाची सध्याची परिस्थिती दयनीय बनत आहे. केवळ बालगंधर्व रंगमंदिर आहे म्हणून पुण्यात बाहेरगाव नाट्य प्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. हे हक्काचे ठिकाण नाहीसे झाले तर प्रयोग होणे बंद होतील. कलाकारांवर उपासमारीची वेळ येईल; त्यामुळे पुणे महानगरपालिकेने हे नाट्यगृह पाडू नये, असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.

नव्या नाट्यगृहांची सुव्यवस्था राखावी

पुणे महानगरपालिकेकडून पुणे शहरात सुमारे 15 नाट्यगृहांची निर्मिती करण्यात आली आहे. त्या रंगमंदिरांच्या दुरवस्थेबाबत कायम आरडा-ओरडा होत असतो. पुणे महानगरपालिकेत सुमारे 18 हजार कर्मचारी असून, असा आरडा ओरडा होणे ही निंदनीय बाब आहे. त्यामुळे पालिकेने सर्वप्रथम नाट्यगृहांची सुव्यवस्था राखण्यावर भर द्यायला हवा. तसेच नाट्यगृहांच्या देखभालीसाठी नाट्यप्रेमी कर्मचार्‍यांची नेमणूक करायला हवी.    मकरंद टिल्लू, कार्यवाहक, अ. भा. म. नाट्य परिषद, पुणे