Sat, Apr 20, 2019 10:46होमपेज › Pune › शहरात परदेशातील मुलींचे सेक्स रॅकेट

शहरात परदेशातील मुलींचे सेक्स रॅकेट

Published On: Jun 30 2018 1:19AM | Last Updated: Jun 30 2018 1:15AMपुणे : पुष्कराज दांडेकर 

टिप मिळाल्यानंतर पोलिसांचा हाय प्रोफाईल मसाज सेंटरवर छापा....तेथे गेल्यावर मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे स्पष्ट... पण यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे येथे परदेशातील सर्वाधिक मुली सापडतात! अशा अनेक घटना गेल्या काही दिवसात पुणे शहरात घडल्या आहेत. गेल्या काही वर्षातील अशा कारवायांमध्ये परदेशातील मुलींचा वेश्या व्यवसायातील सहभाग वाढल्याची नोंद पोलिस रेकॉर्डवर झाली आहे. या सेक्स रॅकेटमध्ये एजंट आणि त्यांच्याकरवी मोठे अर्थकारण सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  थायलंड, नेपाळ, रशिया, उझबेकिस्तान, तुर्कमेनीस्तान, बांग्लादेश आणि इतर देशांतील तब्बल 12 विदेशी मुलींची पोलिसांनी मागील सहा महिन्यात सुटका केली आहे. तर मागील वर्षी 20 विदेशी मुलींची सुटका करण्यात आली आहे. 

एजंटांकडून मुलींची रवानगी पुण्यात 

थायलंड, मलेशिया, रशिया, उझबेकिस्तान, तुर्कमेनीस्तान यासारख्या देशातून गोर्‍या गोमट्या मुलींची  आंतरराष्ट्रीय एजंटाकडून दिल्ली, मुंबई, बंगळुरु, कलकत्तासारख्या शहरांत रवानगी केली जाते. तेथे आल्यावर स्थानिक एजंट मुलींना देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये पाठवत असतात. या एजंटांनाही या व्यवहारात तगडा पैसा मिळतो. असे सुत्राने सांगितले.

टुरिस्ट व्हिसावर येतात भारतात 

या देशांमधील मुली भारतात टुरिस्ट व्हिसावर येतात. त्यानंतर त्यांना येथे वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरविले जाते. त्यात पुण्यातही या मुलींना आणले जाते. त्यांना भाड्याने फ्लॅट घेऊन पुण्यात ठेवले जाते. त्यानंतर एजंटांकरवी ग्राहकांना उच्चभ्रू स्पा, मसाज सेंटर, पंचतारांकित हॉटेल्सच्या माध्यमातून मुली पुरविल्या जातात.  

काही स्पा, मसाज पार्लरच्या माध्यमातून सेक्स रॅकेट  

थाई स्पा हा नागरिकांच्या आकषर्णाचा ठरत विषय आहे. शहरातील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये चालणार्‍या स्पा आणि मसाज सेंटरचे नागरिकांना आकर्षण आहे. यातील काही स्पा आणि मसाज सेंटरमध्ये सेक्स रॅकेटचा काळा धंदा चालविला जातो. यासाठी ग्राहकही मोठी किंमत मोजायला तयार असतात. मागील वर्षी पोलिसांनी बाणेर येथे चालणार्‍या उच्चभ्रू परिसरातील मसाज सेंटरमध्ये चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करून, तेथून थायलंडच्या मुलींची सुटका केली होती.

गरीब देशांतील मुली 

वेश्या व्यवसायाच्या काळ्या धंद्यात बांगलादेश, नेपाळ, थायलंडसारख्या विकसनशील आणि गरीब देशातील मुलींना नोकरीच्या अमिषाने, पैशांच्या अमिषाने भारतात आणून या धंद्यात लोटले जाते. कमी पैशात त्यांची विक्री करून, नातेवाईकच काही वेळा त्यांना या धंद्यात लोटतात. बांगलादेश, नेपाळ येथील अल्पवयीन मुलींनाही त्यांच्या नकळत्या वयातच या काळ्या धंद्यात लोटले जाते. 

दिवसातून पाच कामे  

दिवसातून पाच कामे करण्याचे टार्गेट एजंटांना असते. त्यांना एकदा परदेशी मुलगी पुरविली, की तिच्या राहण्याची व्यवस्था करण्यापासून ते तिला पाच ग्राहक देऊन, त्याचे पैसे जमविणे, वरच्या एजंटांना त्यांचे कमीशन देणे, स्वत:चे कमीशन ठेवणे आणि उरलेले पैसे मुलींना देणे, अशी त्यांची कार्यपद्धती असल्याची माहिती सुत्राने दिली. 

सोशल मिडीयावरून ग्राहकांशी संपर्क 

व्हाट्स अप च्या माध्यमातून ग्राहकांना मुलींचे फोटो पाठवून त्याद्वारे ग्राहकांना हेरले जाते. अशाच पद्धतीने हायप्रोफाईल  सेक्स रॅकेट चालविणार्‍या टोळीचा पर्दाफाश करून त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.