Thu, Aug 22, 2019 10:12होमपेज › Pune › पुणे विभागातही  मुलींचाच डंका

पुणे विभागातही  मुलींचाच डंका

Published On: May 31 2018 1:44AM | Last Updated: May 31 2018 1:44AMपुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत राज्याप्रमाणेच पुणे विभागाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली असून, विभागातून मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 94.34 टक्के एवढे आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात मात्र घसरण झाली असून, विभागाचा निकाल 89.58 टक्के एवढा लागला आहे. गेल्यावर्षी पुणे विभागाचा निकाल 91.16 टक्के लागला होता. यावर्षी पुणे विभाग राज्यात तिसर्‍या स्थानावर आहे. दरम्यान, शंभर टक्के निकाल लागलेली सर्वाधिक कनिष्ठ महाविद्यालये पुणे विभागातच आहेत.

यावर्षी पुणे विभागातून तब्बल 2 लाख 35 हजार 747 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 लाख 35 हजार 502 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील 2 लाख 10 हजार 963 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागातून एकूण 1 लाख 2 हजार 628 विद्यार्थिनींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 96 हजार 823 विद्यार्थिंनी उत्तीर्ण झाल्या. तर विभागातून 1 लाख 32 हजार 874 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 1 लाख 14 हजार 140 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागातील 30.72 टक्के पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण 9 हजार 95 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 2 हजार 794 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरम्यान, विभागात एकूण परीक्षा कालावधीत कॉपीसह इतर 38 गैरप्रकारांची प्रकरणे समोर आली होती.

विभागात पुणे अव्वल

पुणे विभागात समावेश होत असलेल्या तीन जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक लागला आहे. पुणे जिल्ह्यातून एकूण 1 लाख 21 हजार 993 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 1 लाख 09 हजार 601 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा निकाल 89.84 टक्के एवढा लागला आहे. अहमदनगर जिल्ह्यातून 62 हजार 141 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 55 हजार 461 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा निकाल 89.25 टक्के लागला आहे. सोलापूर जिल्ह्यातून 51 हजार 368 विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी 45 हजार 901 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा निकाल 89.58 टक्के एवढा लागला आहे. 

विज्ञान शाखा निकालात पुढे

पुणे विभागात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक 96.76 टक्के लागला आहे. त्याखालोखाल कॉमर्स शाखेचा निकाल 90.71 टक्के, व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेचा निकाल 83.75 टक्के आणि आर्ट्स शाखेचा निकाल सर्वात कमी म्हणजेच 77.22 टक्के एवढा लागला आहे. पुणे जिल्ह्यात सायन्स शाखेचा 96.30 टक्के, कॉमर्सचा 89.96 टक्के, व्यावसायिक अभ्यासक्रमाचा 83.47 टक्के आणि आर्ट्स शाखेचा 76.38 टक्के निकाल लागला आहे. अहमदनगर जिल्ह्यात सायन्स शाखेचा 97.29 टक्के, कॉमर्सचा 92.75 टक्के, व्यावसायिक अभ्यासक्रमाचा 81.66 आणि आर्टसचा 75.46 टक्के निकाल लागला आहे. तर सोलापूर जिल्ह्यात सायन्स शाखेचा 96.76 टक्के, कॉमर्स शाखेचा 90.71 टक्के, व्यावसायिक अभ्यासक्रमाचा 83.75 टक्के आणि आर्ट्स शाखेचा 77.22 टक्के निकाल लागला आहे. 

100 टक्के निकालात पुणे विभाग आघाडीवर

राज्यातील 100 टक्के निकाल लागलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये पुणे विभाग आघाडीवर आहे. राज्यातील तब्बल 2 हजार 301 महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के एवढा लागला आहे. त्यामध्ये पुणे विभागातील महाविद्यालयांची संख्या सर्वाधिक आहे. विज्ञान शाखेत 100 टक्के निकाल लागलेल्या महाविद्यालयांमध्ये पुणे विभागातील तब्बल 308 महाविद्यालयांचा समावेश आहे, तर वाणिज्य शाखेत पुणे विभागातील 127 महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. कला शाखेच्या पुणे विभागातील 54 महाविद्यालयांचा 100 टक्के निकाल लागला आहे.निवांत अंध मुक्‍त विकासालय ही संस्था उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विशेष दृष्टीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्य करते. या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी बारावीत घवघवीत यश मिळवल्यानंतर आनंद व्यक्‍त केला. 

पाच हजार जणांची नव्वदी पार

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला. राज्यातील परीक्षेचा निकाल 88.41 टक्के इतका लागला आहे. या निकालानुसार राज्यात तब्बल 5 हजार 486 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, तर 2 हजार 301 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला असून, 48 महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली आहे.

फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये  बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातून 14 लाख 18 हजार 645 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यामध्ये कला शाखेच्या 4 लाख 47 हजार 468, विज्ञान शाखेच्या 5 लाख 64 हजार 429 तर वाणिज्य शाखेच्या 3 लाख 52 हजार 425 विद्यार्थ्यांचा समावेश होता. या परीक्षेत यंदाही मुलींनी बाजी मारली असून 92.36 टक्के मुली, तर 85.23 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.
राज्यात 90 आणि त्यापेक्षा अधिक टक्क्यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 5 हजार 486 इतकी असून त्यात मुंबई विभागाने बाजी मारली आहे. मुंबईतील 2 हजार 288 विद्यार्थी आहेत. तसेच पुणे 790, नागपूर 698, औरंगाबाद 284, कोल्हापूर 350, अमरावती 594, नाशिक 156, लातूर 259, तर सर्वात कमी कोकण विभागात 67  विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. 

दरम्यान, यावर्षी विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यावसायिक अभ्यासक्रम या शाखांच्या निकालानुसार विज्ञान शाखेतील 10, कला शाखेतील सर्वाधिक 26, वाणिज्य शाखेतील 11, तर व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेतील एक अशा एकूण 48 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. तर शंभर टक्के निकाल लागलेल्या महाविद्यालयांची संख्या जवळपास 2 हजार 301 असून कला शाखेतील 290, वाणिज्य शाखेतील 594, विज्ञान शाखेतील 1 हजार 356, तर व्यवसाय अभ्यासक्रमाच्या 61 अशा एकूण 2 हजार 301 कनिष्ठ महाविद्यालयांनी शंभर टक्के घवघवीत यश मिळवले आहे. 

दिवसा नोकरी... रात्री शाळा...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (दि. 30) जाहीर झाला. शहरातील पूना नाईट स्कूलचा आकाश पंढरीनाथ धिंडले हा विद्यार्थी 79 टक्के गुण मिळवून रात्र महाविद्यालयातून पहिला आला आहे. वेल्हा तालुक्यातील घिसरगावमधील आकाश धिंडले हा विद्यार्थी पुण्यातील एका कॉस्मेटिकमध्ये नोकरी करतो. दिवसा नोकरी व रात्री अभ्यास असा आकाशचा दिनक्रम असायचा. 

महाविद्यालयाच्या जवळच असणार्‍या तुळशीबागेतील कॉस्मेटिकच्या दुकानात काम करून आकाशने 79 टक्के गुण मिळवत शाळेतून पहिला क्रमांक पटकावला. आकाश हा वेल्हे तालुक्यातील घिसरगावचा रहिवासी आहे. दहावीत 81 टक्के गुण मिळवल्यानंतर त्याने पुण्यातील पूना नाईट हायस्कूल येथे प्रवेश घेतला आणि कॉस्मेटिकच्या दुकानात काम करून अभ्यास करत या रात्रशाळेत प्रथम येण्याचा पराक्रम केला. लहानपणापासूनच हुशार असलेल्या आकाशचे वडील शेतकरी असून, गावात त्यांची 4 एकर जमीन आहे. पण शेतीच्या उत्पन्नावर शिक्षण खर्च भागत नव्हता. तसेच शिक्षण अर्धवट सोडणेही आकाशला मान्य नव्हते म्हणूनच त्याने पुण्यात नोकरी करून शिकण्याचा निर्णय घेतला. आकाश दिवसभर दुकानात काम करून  संध्याकाळी 6.30 वाजता शाळेत जात असे. आयुष्यात पुढे जायचे असेल तर शिक्षणाला पर्याय नाही.

त्यासाठी पुढेही कामासोबत शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्धार आकाशने व्यक्त केला. शहरातील पूना नाईट हायस्कूल संस्थेचा बारावीचा निकाल यावर्षी 86 टक्के लागला आहे. आपल्या आर्थिक हलाखीच्या परिस्थितीमुळे, तर वेळेच्या अभावी दिवसा शिकता न येणार्‍या अनेकांनी रात्रशाळेत शिकत यश मिळवले आहे. कोण दुकानात काम करत, तर कोणी डिलिव्हरी बॉय म्हणून, मात्र त्यांच्या प्रत्येकातला समान धागा म्हणजे शिक्षणाची ओढ. शिक्षण घ्यायचे आणि कुटुंबाला हातभार लावायचा या हेतूने हे विद्यार्थी या ठिकाणी आलेले असतात. 

याबाबत पूना नाईट हायस्कूलचे प्राचार्य अविनाश ताकवले म्हणाले, यावर्षी रात्रशाळेतील 120 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 104 विद्यार्थी पास झाले असून, शाळेचा निकाल 86 टक्के लागला आहे. रात्रशाळेच्या इतिहासात आतापर्यंतचा सर्वोच्च 86 टक्के निकाल लागला आहे. यावर्षी आकाश धिंडले याने 79.23 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, तर दिनेश यादव याने 75.69 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तसेच मुलींमध्ये अश्‍विनी हिरवे हिने 67.38 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, अशी माहिती प्राचार्य ताकवले यांनी दिली.

इंग्रजीने अनेकांना फोडला घाम

इंग्रजी विषयाची भीती नको, असे शाळांत सांगितले जात असले तरी इंग्रजी विषयाचा मुकाबला करण्यासाठी बारावीचे विद्यार्थी कमीच पडताना दिसत आहेत. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत तब्बल 1 लाख 62 हजार 345 विद्यार्थी नापास झाले आहेत. यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या अधिक असलेल्या मुंबई विभागात 31 हजार 585 विद्यार्थ्यांची इंग्रजीला दांडी गुल्‍ल झाली आहे.

इंग्रजी हा विषय विज्ञान, कला, वाणिज्य तीनही शाखांना सक्‍तीचा आहे. या विषयाची परीक्षा 14 लाख 54 हजार 650 विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी 12 लाख 92 हजार 305 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची टक्केवारी 88.84 इतकी आहे. मुंबई विभागातून 3 लाख 20 हजार 984 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 2 लाख 89 हजार 399 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबईचे उत्तीर्ण प्रमाण 90.16 टक्के इतके आहे. सर्वाधिक निकाल हा विज्ञान शाखेचा निकाल 95.85 टक्के इतका लागला आहे. इतर सर्व शाखांचे निकाल घटले असले तरी विज्ञान शाखेच्या निकालात काहीही फरक पडलेला नाही. गेल्यावर्षीही 95.85 इतकाच निकाल लागला होता.

विज्ञान शाखेतून एकूण 5 लाख 52 हजार 171 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 5 लाख 40 हजार 563 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. फिजिक्सचा निकाल 97.80 टक्के लागला आहे. तब्बल 5 लाख 58 हजार 727 विद्यार्थी या विषयात उत्तीर्ण झाले, तसेच केमिस्ट्रीचा निकाल 98.67 टक्के, तर बायोलॉजीचा निकाल 98.41 टक्के इतका लागला आहे. गणितात 96.18 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.