Mon, Nov 19, 2018 14:48



होमपेज › Pune › टिळकांच्या शाळेत ८१ वर्षानंतर मुलींना प्रवेश

टिळकांच्या शाळेत ८१ वर्षानंतर मुलींना प्रवेश

Published On: Jun 16 2018 1:31AM | Last Updated: Jun 16 2018 12:44AM



पुणे : प्रतिनिधी 

लोकमान्य  टिळक यांनी 1880 मध्ये स्थापन केलेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शुक्रवारी 81 वर्षांनंतर पहिल्यांदाच मुलींना प्रवेश देण्यात आला. त्यामुळे मुलांसह मुलींच्या सह-शिक्षणास प्रारंभ झाला. विशेष म्हणजे शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन प्रवेश घेतलेल्या मुलींचा पहिला तास महापौर  मुक्ता टिळक यांनी घेतला. 

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 1936 पर्यंत मुलींना प्रवेश दिल्याच्या नोंदी आढळतात. त्यानंतर 81 वर्षे या शाळेत फक्त मुलांना प्रवेश दिला जात होता. या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थिनींना प्रवेश देण्याचा निर्णय डीइएस व्यवस्थापनाने घेतला. 

या ऐतिहासिक घटनेच्या तुम्ही सार्‍या जणी घटक आहात. झाशीच्या राणीप्रमाणे पराक्रमी व्हा, अशा शब्दात महापौरांनी विद्यार्थिनींचे स्वागत केले. यावेळी डीइएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, संचालक सुनील भंडगे, मुख्याध्यापक नागेश मोने उपस्थित होते.   

महापौर म्हणाल्या, लोकमान्य टिळक, समाजसुधारक आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, महादेव बल्लाळ नामजोशी या धुरीणांनी 1880 मध्ये नाना वाड्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात वर्गात बेंच नव्हते. मुलांना जमिनीवर बसावे लागायचे. ही जमीन खडबडीत व खड्डेयुक्त होती. शाळा सुरू व्हायच्या आदल्या दिवशी लोकमान्यांनी वर्गाची स्थिती पाहिली. मुलांची गैरसोय व्हायला नको म्हणून स्वतः खड्डे बुजवून जमीन शेणाने सारवून घेतली. या धुरीणांची दूरदृष्टी आणि त्यांनी घेतलेल्या अपार कष्टांमुळेच आज हे शैक्षणिक वैभव पाहायला मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.

राम गणेश गडकरी, केशवसूत, बाळासाहेब खेर, ना. ग. गोरे, एस. एम. जोशी, गोपिनाथ तळवलकर असे प्रतिभावंत विद्यार्थी घडविणार्‍या या शाळेत पालकांची मागणी लक्षात घेऊन, यावर्षीपासून मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर्षी इयत्ता पाचवीत 30 विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला असून, ही संख्या शंभरपर्यंत वाढू शकते, असा विश्‍वास डॉ. कुंटे यांनी व्यक्त केला. शाळेतील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची माहिती मुख्याध्यापक नागेश मोने यांनी दिली.