होमपेज › Pune › तरुणाच्या मानसिक त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या 

तरुणाच्या मानसिक त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या 

Published On: Jan 11 2018 1:10AM | Last Updated: Jan 11 2018 12:04AM

बुकमार्क करा
पुणे प्रतिनिधी 

शेजारीच राहणार्‍या तरुणाने फोनवरून व प्रत्यक्ष भेटून दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून नेहा पिंटू चौधरी (15 ) या  मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी औंध परिसरात घडला. 

याप्रकरणी मुलीची आई सरस्वती चौधरी (कस्तूरबा वसाहत) यांनी  चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋषिकेश राजू सरतापे (20, कस्तुरबा वसाहत, औंध) याच्याविरोधात चतुश्रृंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व ऋषिकेश सरतापे कस्तुरबा वसाहतीत राहण्यास आहेत. दरम्यान फिर्यादी महिला धुणीभांडी करून उपजिविका करते. तर त्यांच्या पतीचे काही वर्षापूर्वी निधन झाले आहे. नेहाच्या शिक्षणाचा  खर्च करता येणे शक्य नसल्याने ती शाळेत जात नव्हती. मात्र त्यांच्या शेजारीच ऋषिकेश राहण्यास आहे. तो नेहाला वारंवार भेटायचा. त्यामुळे फिर्यादी महिलेने त्यांना भेटू नका असे सांगितले होते. मात्र त्यानंतर काही वेळा ऋषिकेशने तिला फोनवरून व प्रत्यक्ष भेटून शिवीगाळ करून त्रास दिल्याबाबत तिने आईला सांगितले होते. 

दरम्यान मंगळवारी फिर्यादी या घरी आल्यावर त्यांना नेहा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यांनी तिला औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.त्यानंतर त्या घरी आल्यावर नेहाचा मोबाईल तपासला. त्यावेळी शेवटचा कॉल हा ऋषिकेशचा असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला.