Tue, Apr 23, 2019 20:23होमपेज › Pune › पालकमंत्र्यांनी घेतला मेट्रोच्या कामाचा आढावा

पालकमंत्र्यांनी घेतला मेट्रोच्या कामाचा आढावा

Published On: Apr 06 2018 1:29AM | Last Updated: Apr 06 2018 1:14AMपुणे : प्रतिनिधी 

पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरूवारी पुणे ‘मेट्रो’च्या कामाचा आढावा घेतला. सकाळी शिवाजीनगर धान्य गोदाम, कृषी महाविद्यालयाचे मैदान, रेंजहिल्स तसेच खडकी स्टेशन येथे जाऊन प्रत्यक्ष कामाची त्यांनी पाहणी केली. ‘मेट्रो’च्या कामाला आणखी गती देण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना सूचना केल्या. चालू कामाविषयी त्यांनी समाधानही व्यक्त केले.  

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हा मार्ग क्रमांक 1 आणि वनाज ते रामवाडी मार्ग क्रमांक 2 या टप्प्यात पुणे ‘मेट्रो’चे काम सुरू आहे. सध्या ‘मेट्रो’च्या कामाने चांगलाच वेग घेतलेला आहे. शिवाजी नगर येथे धान्याची 21 गोदामे असून तेथे 15 इमारती आहेत. या पंधरापैकी हवेली सेतू केंद्राच्या जागेसह चार गोदामांचे ‘महामेट्रो’कडे हस्तांतरण करण्यात आले आहे. येथे असणार्‍या सेतू केंद्राची जागा रिकामी करण्यात आली असून हे सेतू केंद्र लवकरच एसटीच्या जागेवर स्थलांतरित करण्यात येणार आहे. तर पुणे जिल्हा नागरी सुविधा केंद्र वैकुंठभाई मेहता महाविद्यालयाशेजारी असणार्‍या जागेत हलवण्यात येणार आहे.

अन्य दोन इमारतींचा ताबाही लवकरच ‘मेट्रो’कडे देण्यात येणार आहे. उर्वरित इमारतींमध्ये पुरवठा विभाग, अन्न धान्य वितरण विभाग तसेच जिल्हा प्रशासनाचे साहित्य तसेच अन्न धान्य असल्याने या इमारती अद्याप ‘मेट्रो’कडे हस्तांतरित करण्यात आल्या नाहीत. या इमारती मेट्रो देण्याबाबत काय अडचणी आहेत याची पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली. येथील गोदामांसाठी एकत्रित जागा न मिळाल्यास वेगवेगळ्या ठिकाणी विभागानुसार ही गोदामे स्थलांतरित करावी अशी सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केली.

कृषी महाविद्यालयाच्या मैदानात ‘मेट्रो’चा डेपो करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड ते कृषी महाविद्यालयापर्यंत मेट्रो जमिनीवरून जाणार आहे. तर कृषी महाविद्यालयाचे मैदान येथून स्वारगेटपर्यंत मेट्रो भुयारी मार्गातून जाणार आहे. या कामाच्या प्रगतीबद्दल त्यांनी माहिती घेतली. ‘मेट्रो’च्या कामामुळे कामगार पुतळा येथील 200 झोपड्या बाधित होणार आहेत. तसेच राजीव गांधी नगर येथे 36 झोपड्या बाधित होणार आहेत. या झोपड्यांचे पुनर्वसन तसेच मेट्रोच्या मार्गात येणार्‍या 400 झाडांचे पुर्नरोपण ‘मेट्रो’कडून करण्यात येणार आहे. याबाबत ही बापट यांनी माहिती घेतली. या गोदामांमध्ये कार्यरत असणार्‍या हमालांना ही ‘मेट्रो’ने त्यांच्या सेवेत सहभागी करून घ्यावे, अशा सूचना त्यांनी ‘मेट्रो’च्या अधिकार्‍यांना केल्या. त्याचप्रमाणे त्यांनी खडकी स्टेशन तसेच रेंजहिल्स येथील संरक्षण विभागाच्या जागेवर जाऊन मेट्रो मार्गाची पाहणी केली.