Wed, Jul 17, 2019 19:04होमपेज › Pune › अडीच वर्षापासून नातवाची टाळली जातेय आजी-आजोबांपासून भेट

अडीच वर्षापासून नातवाची टाळली जातेय आजी-आजोबांपासून भेट

Published On: Sep 10 2018 1:17AM | Last Updated: Sep 10 2018 1:03AMपुणे : प्रतिनिधी

नातवांना आजी आजोबांचा सहवास आवश्यक असताना पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात जाणून बुजून नातवापासून आजी आजोबांची ताटातूट केल्याचा विलक्षण प्रकार समोर आला आहे. साडेतीन वर्षापर्यंत नातवाला सांभाळणार्‍या आजीला मागील अडीच वर्षापासून नातवाची भेट टाळली जात आहे.     

लक्ष (नातू- नाव बदललेले) हा सध्या सव्वा पाच वर्षाचा असून त्याची आजी (70 वर्ष) डॉक्टर आहे. सुनेचा पहिला विवाह झाला असताना तेथील संसार सोडून रक्षा (सुन- नाव बदललेले) हिने अजय (मुलगा-नाव बदललेले) प्रेम विवाह केला. विवाहानंतर रक्षा आणि अजय यांना मुलगा झाला. प्रसुतीनंतर आठ महिने मुलाला सांभाळल्यानंतर दोघेही लक्षला आजीकडे सोपवून दोघेही महाराष्ट्राबाहेर कामानिमित्त गेले. आठ महिन्यांंचा असल्यापासून आजीने साडेतीन वर्षापर्यंत सांभाळ केला. पैशाच्या कारणावरून वाद झाल्याने रक्षा रागारागाने लक्षला साडेतीन वर्षाचा असताना घेऊन गेली.

आजीने आग्रह केल्यानंतर लक्ष आजीकडे आला. अंघोळ घालत आजीला त्याच्या शरीरावर ताज्या जखमा दिसल्या. तेव्हा लक्षने ममाने गंभीर जखमा केल्याचे सांगितले. अजयला जेव्हा आईने ही गोष्ट सांगितली. त्याने याकडे दुर्लक्ष करून लक्षला मारत घरी घेऊन गेला. याच वादातून तो वडिलांवरही धावून गेला. त्यानंतर मुलगा नातवाला मारेल या भिती पोटी त्या पोलिस ठाण्यात गेल्या. तक्रारही दिली. परंतु, त्यांनी पुन्हा नातवाची कधीही भेट होणार नाही या भितीपोटी केस मागे घेतली. परंतु, आजीला न राहविल्याने दुसर्‍या दिवशी आजी पुन्हा पोलिस आयुक्‍त कार्यालयात गेल्या, तिथे याबाबत तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दाखल होऊन सुनेला अटक झाली. त्यानंतर आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे आजीने चाईल्ड वेलफेअर सेंटरला भेट दिली. परंतु, तेथेही काही मार्ग निघाला नाही. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.  

सुनेला किंवा मुलाला शासन व्हावे हा मुळात हेतू नाही. नातवाचे कल्याण आणि त्याची भेट हा महत्त्वाचा हेतू तेव्हाही होता आणि आताही आहे, असे आजीचे म्हणणे आहे. आमचे आयुष्य काही दिवसांचे राहिले आहे. मुलाला आजी आजोबांचा सहवासही लाभला पाहिजे. नातवापासून ताटातूट झालेल्या आजीच्या वेदना अजूनही कमी होऊ शकल्या नाहीत.