Sun, May 19, 2019 22:01होमपेज › Pune › श्री क्षेत्र घोरावडेश्वर मावळवासीयांचे शक्तीस्थळ

श्री क्षेत्र घोरावडेश्वर मावळवासीयांचे शक्तीस्थळ

Published On: Feb 13 2018 2:01AM | Last Updated: Feb 12 2018 10:44PMशिरगाव : बद्रीनारायण लेंडगुळे 

क्षेत्र घोरवडेश्वर म्हणजे मावळवासीयांचे शक्तीस्थळ आहे. हे पवित्रस्थळ वसले आहे शेलारवाडी जवळील  डोंगररांगात. श्रावणी सोमवार तसेच शिवरात्रीनिमित्त याठिकाणी मावळच्या पंचक्रोशीतून दर्शनासाठी भक्तांची रांग लागते. 

पुण्यावरून मुंबईकडे जाताना द्रुतगतीमार्ग आणि जुन्या महामार्गाच्यामधील डोंगररांगा पावसाळ्यात हिरवीगार शाल पांघरून पर्यटकांना आपल्या सौंदर्याची भुरळ घालतात. या डोंगरारांगात पांडवकालीन कोरीव लेणी असून, या लेण्यातच कोरलेल श्री महादेवाचे नमोहक मंदिर असून घोरावडेश्वर नावाने ते पंचक्रोशीत ओळखले जाते. हे मंदिर म्हणजे प्राचीन शिल्पकलेचा एक अद्भुत नमुना म्हणावा लागेल. अज्ञातवासात असताना पांडवांनी या मंदिराची उभारणी केली असल्याची आख्यायिका आहे. या मंदिराच्या पायथ्याशी वसलेले अमरजाई देवीच मंदिर आहे. पांडवांची काळजी घेण्यास स्वतः अमरजाईदेवी येथे अवतीर्ण झाल्याचेही संगीतले जाते. सदर मंदिर हे पूर्णपणे खडकामध्ये कोरलेले असल्याने याच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते.  

मंदिरापासून काही अंतरावर बौद्धकालीन आणि अतिपुरातन लेण्यांत 9 खोल्या आहेत. याठिकाणी पर्यटक आणि इतिहास अभ्यासकांची नेहमी वर्दळ पहावयास मिळते. मंदिराचे सौंदर्य म्हणजे शिवलिंग. या लेण्यांचे एक विशेष आकर्षण म्हणजे येथे असलेल्या पाण्याच्या टाक्या सध्या चार ते पाचच शिल्लक आहेत. या टाक्यांत वर्षभर स्वच्छ व शीतल पाणी असते, जे भाविकांची तसेच पर्यटकांची तहान भागवत असते. मंदिरात जाण्यासाठी सुमारे साडेतीनशे पायर्‍या चढून जावे लागते; काही पर्यटक डोंगर चढून जाणेच पसंत करतात. या पायर्‍यांवर विजेच्या दिव्यांची सोय असल्याने रात्री मंदिर परिसर उजळून निघतो.

झाडामधून मार्ग काढताना खाली बघितल्यास दिसतो पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग. खाली खोल अशी दरी आणि तिच्यातून येणारी थंडगार हवा घेताना पर्यटक निसर्गापुढे माथा टेकवतात. डोंगर परिसरात व्यायाम करणार्‍यांचीदेखील सकाळच्यावेळी वर्दळ असते. पहाटेच्यावेळी डोंगरावर आल्यावर येथे मिळणारी स्वच्छ हवा मनास मोहवून टाकते; तसेच शंभू महादेवाचे दर्शन झाल्याने याठिकाणी येणार्‍या व्यक्ती शरीर व मनाने ताजेतावने होवून जातात.