Thu, Jun 20, 2019 01:34होमपेज › Pune › सरकारी रुग्णालयांच्या खाजगीकरणाचा घाट

सरकारी रुग्णालयांच्या खाजगीकरणाचा घाट

Published On: Jan 25 2018 1:18AM | Last Updated: Jan 25 2018 12:35AMपुणे ः प्रतिनिधी

राज्यातील 300 खाटा असलेले सरकारी रुग्णालये भांडवलदारांच्या घशात घालण्याचा घाट  सरकारने घातला आहे. ही रुग्णालये ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’ (पीपीपी) तत्वावर उदयोगपतींना चालवण्यासाठी देण्यात येणार असून तेथे याच तत्वावर वैद्यकिय महाविद्यालयेदेखील स्थापन करण्यात येणार आहेत.  शासनाच्या या खासगीकरणाच्या हेतूचा आरोग्य क्षेत्रातील संघटनांकडून कडाडून विरोध होत आहे. 

गुजरात मधील ‘अदानी मॉडेल’ चा दाखला देऊन महाराष्ट्र  सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बुधवारी हा शासन निर्णय जारी केला आहे. आरोग्य आयुक्‍तांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य संचालक आणि वैद्यकिय शिक्षण संचालक यांचा समावेश असलेली ही समिती येत्या तीन महिन्यांत शासनाला अहवाल सादर करणार आहे. 

यानुसार सरकारी जिल्हा रुग्णालयांच्या खासगीकरणाची प्रक्रिया शासनाने सुरु केली आहे.  राज्यातील प्रत्येक जिल्हयाच्या ठिकाणी एक वैद्यकिय महाविद्यालय स्थापना करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यानुसार 300 खाटा असलेली रुग्णालये प्रथम ‘पीपीपी’ तत्वावर खासगीकरण करण्याचा आणि नंतर त्याद्वारे याच तत्वावर कंपनी कायद्यान्वये वैद्यकिय महाविद्यालये उघडण्याचा शासनाचा हेतू आहे, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.

अशा प्रकारे कंपनी कायद्यानुसार राज्यात ‘वेदांत’ हे पहिले वैद्यकिय महाविद्यालय पालघर जिल्हयात गेल्यावर्षी स्थापन करण्यात आले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांकडून पैसे घेउन प्रवेशदेखील झालेले आहेत. अशी महाविद्यालये राज्यभर स्थापन करण्याचा शासनाचा विचार आहे. त्याला आरोग्य क्षेत्रातील अनेक संघटनांनी विरोध केला आहे.  पुणे जिल्हयाचा विचार केला असता 300 खाटांचे एकमेव औंध जिल्हा रुग्णालय असून त्यामुळे हे रुग्णालय ‘पीपीपी’ तत्वावर चालण्यासाठी दिले जाउ शकते, असे शासकीय आरोग्य क्षेत्रातील सूत्रांचे म्हणने आहे.