Thu, Jul 18, 2019 20:46होमपेज › Pune › पेडियाट्रिक’च्या धर्तीवर आता ‘जेरियाट्रिक्स’

पेडियाट्रिक’च्या धर्तीवर आता ‘जेरियाट्रिक्स’

Published On: Jul 29 2018 1:24AM | Last Updated: Jul 29 2018 1:20AMपुणे : प्रतिनिधी

वार्धक्यातील आजार, औषधोपचार व इतर उपचारपध्दती ही प्रौढांच्या उपचारांपेक्षा वेगळी आहे. म्हण्ाून त्यांच्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विशेष अभ्यासक्रम तयार करणे आणि त्याचे शिक्षण घेतलेल्या तज्ज्ञांचीही आवश्यकता सध्या भासत आहे. ही बाब सध्या वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांच्या लक्षात येत असून काही दिवसांत हा अभ्यासक्रम पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ेयही येण्याची शक्यता आहे. औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात असा अभ्यासक्रम आणि स्वतंत्र वार्डही सुरू झाला असून येत्या काही दिवसांत ससूनमध्येही सुरू होण्याच्या मार्गावर आहे. 

सध्या उपचारांच्या शाखांचा विस्तार झपाटयाने होत आहे. सर्वसाधारपणे आता 40 विशेषोपचार शाखा आहेत.  बालकांच्या आजारांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अभ्यासक्रम आणि औषधोपचारपध्दती वेगळी आहे, त्याला ‘पेडियाट्रिक’ शाखा म्हणतात. त्याच धर्तीवर वार्धक्यातील आजारांवर उपचार करण्यासाठी आता ‘जेरियाट्रिक’ शाखा उदयास येत आहे.  60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्‍तींना जेष्ठ नागरिक संबोधतात. वृध्दापकाळात मधुमेह, दम्याचे आजार तर अनेक अवयवांची झीज झाल्याने सांधेदुखी, अंगदुखी असे अनेक उपचार करणे गरजेचे असते. 

या विषयावर जागृती होण्यासाठी पाच वर्षापासून  इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेच्यावतीने परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. या महिन्यात 14 ते 15 जुलैला ‘जेरीकॉन’ परिषद झाली. त्यामध्ये राज्यातील विविध तज्ज्ञांनी सहभाग नोंदवला. या परिषदेत ज्येष्ठांना येणार्‍या आरोग्य विषयक समस्या, मानसिक ताणतणाव, अडचणी, बदलत्या हवामानाचा त्यांच्यावर होणारा परिणाम आदी सर्व विषयांबाबत या परिषदेत चर्चा करण्यात आली. 

याबाबत बोलताना पुणे आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले की,  लहान मुलांसाठी जसे बालरोग ही शाखा आहे, तशी आता जेरियाट्रिक्स शाखेची गरज आहे. वृध्दापकाळातील आजार व औषधोपचार वेगळे असतात. त्यांना सर्वसामान्य रुग्णांना देण्यात येणारे औषध चालत नाही. या वेगळया शाखेसाठी आयएमएकडून सतत पाठपुरावा केला जात आहे.