Fri, Jul 19, 2019 01:28होमपेज › Pune › एकाच पिस्तुलाने दोघांची हत्या

एकाच पिस्तुलाने दोघांची हत्या

Published On: Aug 27 2018 1:38AM | Last Updated: Aug 27 2018 1:37AMपुणे : प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक केलेल्या एका आरोपीने 7.65 एमएमचे देशी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे सचिन अंदुरेला दिली होती. अंदुरेने हे पिस्तूल व काडतुसे मेहुण्याला दिली. हे पिस्तूल व काडतुसे रेगेच्या घरातून जप्त केली होती. ‘अंनिस’चे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर हल्ला करण्यासाठीही 7.65 एमएम या पिस्तुलाचाच वापर झाला होता. त्यामुळे या दोन्ही हत्यांसाठी एकाच पिस्तुलाचा वापर झाला काय, यादृष्टीने सीबीआयचा तपास सुरू आहे.

गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अमोल काळे, अमित दिगवेकर यांच्यासह एकाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या अनुषंगाने रेकी केल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेल्या तपासामध्ये उघड झाले आहे. लवकरच तिघांना दाभोलकर हत्याप्रकरणी अटक करून त्यांच्याकडे तपास करण्यात येणार असल्याची माहिती (सीबीआय) सूत्रांनी दिली. त्यामुळे गौरी लंकेश हत्या आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या कनेक्शन उघड होण्यास मदत होणार आहे.

अंदुरेच्या कोठडीत वाढ

दरम्यान, सचिन अंदुरेकडे डॉ. दाभोलकर हत्येच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. आर. जाधव यांनी त्याला 30 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सचिन अंदुरेला अटक झाल्यानंतर त्याला रविवारपर्यंत पोलिस कोठडी (26 ऑगस्ट) सुनावण्यात आली होती. त्याची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला रविवारी दुपारी सीबीआयने न्यायालयात हजर केले.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी ओंकारेश्‍वर पुलावर हत्या झाली होती. त्या अनुषंगाने सचिन अंदुरेकडे केलेल्या तपासात महत्त्वपूर्ण बाबी उघड झाल्या असल्याचे सीबीआयचे विशेष सरकारी वकील विजयकुमार ढाकणे यांनी न्यायालयाला सांगितले. 

गौरी हत्येतील आरोपीने अंदुरेला दिले पिस्तूल

गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने 7.65 एमएमचे कन्ट्रीमेड पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे सचिन अंदुरेला दिली होती. 11 ऑगस्ट 2018 रोजी अंदुरेनेही हेच पिस्तूल आणि काडतुसे त्याचा मेहुणा शुभम सुरळेला औरंगाबाद येथे दिले. दरम्यान, सीबीआयने सुरळेच्या घरी तपास केल्यानंतर पिस्तूल आणि तीन काडतुसे त्याने त्याचा मित्र रोहित राजेश रेगे याच्याकडे ठेवण्यासाठी दिल्याचे आढळले. ते पिस्तूल सीबीआयने रोहित रेगेच्या विघ्नहर्ता बिल्डिंग, धावणी मोहल्ला, औरंगाबाद येथून जप्त केल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. ढाकणे यांनी केला.

दोघांच्या हत्येसाठी एकाच पिस्तुलाचा वापर?

दाभोलकर यांच्यावर हल्ला करण्यासाठीही 7.65 एमएम या पिस्तुलाचा वापर झाला होता. दरम्यान, रेगे याच्या घरातून जप्त करण्यात आलेले पिस्तूलही 7.65 एमएमचे असून बॅलेस्टिक अहवालानंतरच डॉ. दाभोलकर हत्येमध्ये या पिस्तुलाचा वापर झाला की नाही? हे स्पष्ट होण्यासाठी मदत होणार असल्याचे सीबीआय सूत्रांनी सांगितले.

दोनही प्रकरणात काही आरोपी समान

शरद कळसकर हा सध्या दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) कोठडीत असून, त्याला मुुंंबई येथील न्यायालयाने 28 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सीबीआयलाही डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी शरद कळसकरचा ताबा हवा आहे. पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात येणार आहे. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्याकडे एकाच वेळी तपास करायचा आहे. तसेच गौरी लंकेश हत्या प्रकरणातील ज्या आरोपींचा डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात सहभाग आहे, त्यांच्याकडेही सीबीआयला तपास करायचा असून, त्यांना या गुन्ह्यात अटक करायची आहे. गौरी लंकेश हत्या प्रकणातील काही आरोपी अंदुरे व डॉ. दाभोलकर हत्येशी संबंधित असल्याचे रिमांड अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे अंदुरेच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी विशेष सरकारी वकील विजयकुमार ढाकणे यांनी केली.

बचाव पक्षाचा युक्तिवाद

डॉ. दाभोलकरांच्या हत्येबाबत काहीच तपास झालेला नाही. सीबीआयकडून दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रात सारंग अकोलकर, विनय पवार यांनी डॉ. दाभोलकर यांची हत्या केल्याचे नमूद केले होते. जतनेचा रोष कमी करण्यासाठी सीबीआयने नवीन थिअरी मांडली आहे, असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. प्रकाश साळशिंगीकर यांनी केला. 

सुरुवातीला नागोरी, खंडेलवाल आणि त्यानंतर वीरेंद्रसिंह तावडेबरोबर विनय पवार आणि सारंग अकोलकर यांचा संबंध जोडण्यात आला. परंतु, त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही. सीबीआयच्या म्हणण्यानुसार संजय साडविलकर यांच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांच्या समोरील साक्षीतही दाखविलेली छायाचित्रे त्यांनी ओळखली होती. ती छायाचित्रे विनय पवार आणि सारंग अकोलकरची असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्या साक्षीमागे त्यांच्या सह्या होत्या, असा युक्तिवाद करून अ‍ॅड. साळशिंगीकर यांनी अंदुरेची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याची मागणी केली.

अंदुरेला भेटण्याची वकिलांना परवानगी

अंदुरेला कोठडीत असताना कुटुंबीय आणि वकिलाला भेटू दिले नाही, असा आरोप अ‍ॅड.  साळशिंगीकर यांनी केला. असे कृत्य करणे म्हणजे न्यायालयाचा अवमान केल्यासारखे आहे. त्यामुळे याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. त्यांचा हा मुद्दा अ‍ॅड. ढाकणे यांनी खोडून काढला. दरम्यान, वकिलांना अंदुरे याला भेटण्याची परवानगी न्यायालयाने दिली होती. परंतु, त्यांनी प्रत्यक्ष येऊन कार्यालयाला भेट देण्यापेक्षा फोनवर संभाषण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे अ‍ॅड. ढाकणे म्हणाले.

दुसरा गोळी झाडणारा शरद कळसकरच

दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणारे सचिन अंदुरे व शरद कळसकर यांनी रेगे याच्याकडून सीबीआयने जप्त केलेले 7.65 एमएमचे पिस्तूल वापरल्याचा दावा केला जात आहे. त्याबरोबरच सीबीआयने दुसरी गोळी झाडणारा हा शरद कळसकर असल्याचे त्यांच्या रिमांड अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. सीबीआयने न्यायालयात सादर केलेल्या रिमांड अहवालामध्ये गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकलचा शोध घेण्याचा प्रयत्न सीबीआय करीत आहे, असे म्हटले आहे.