Thu, Jul 18, 2019 10:50होमपेज › Pune › गॅस एजन्सीजची दोन वर्षांपासून तपासणीच नाही

गॅस एजन्सीजची दोन वर्षांपासून तपासणीच नाही

Published On: Feb 13 2018 2:01AM | Last Updated: Feb 12 2018 11:28PMवाघोली : वार्ताहर

हवेली तालुक्यातील पेट्रोल पंप व गॅस एजन्सीजची 2016 ते 2017 मध्ये पुरवठा विभागाने तपासणीच केली नसल्यामुळे पेट्रोल पंप व गॅस एजन्सीधारकांचा मनमानी कारभार सुरु असून पुरवठा विभागाला तपासणीचा अधिकार नसल्याची माहिती खुद्द पुरवठा विभागाने माहिती अधिकारांतर्गत दिल्याने पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

हवेली तालुक्यात गॅस एजन्सीज व पेट्रोल पंपची मोठी संख्या आहे. ग्राहकही मोठ्याप्रमाणावर आहेत. ग्राहकांच्या हितासाठी पुरवठा विभागाकडून यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे मात्र 2015 ते 2016 या दरम्यान गॅस एजन्सी व 2016 ते 2017 या कालावधीत पेट्रोल पंपाच्या तपासण्या केल्याच गेल्या नाहीत. माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी दि. 17 जुलै 2017 रोजी तालुक्यातील पेट्रोलपंप व गॅस एजन्सीजच्या तपासणी बाबत माहिती मागवली होती.

माहिती वेळेवर देण्यात तर आलीच नाही मात्र अपील नंतर पुरवठा विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीमध्ये वारघडे यांना संबधित कंपन्यांकडून माहिती घ्यावी असे नमूद करण्यात आले. पंप व गॅस एजन्सीज तपासण्याचा अधिकार तहसीलदारांना असल्याचे नायब तहसीलदार यांनी पाठवलेल्या पत्रात माहिती दिली आहे. एकीकडे जनमाहिती अधिकारी तथा महसूल नायब तहसीलदार यांच्याकडून एकाच पत्रामध्ये सदरील माहिती हि गॅस व पेट्रोलियम कंपन्यांशी संबधित असल्यामुळे त्या त्या कंपन्यांशी संपर्क करून माहिती घ्यावी असे उत्तर देण्यात आले. मात्र त्याचवेळी त्याच पत्रामध्ये तपासणीचे अधिकार तहसीलदार यांना असल्याचे सांगण्यात आले.

एव्हढेच नव्हे तर दिलेल्या माहितीमध्ये जिल्हापरिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची आचार संहिता असल्यामुळे पेट्रोल पंपाची तपासणी करता आली नाही अशी स्पष्ट माहिती देण्यात आली आहे. माहिती अधिकारामध्ये दिलेल्या हास्यास्पद माहितीमुळे पुरवठा विभागाचा सावळा गोंधळ पुढे आला आहे.