Mon, Jul 22, 2019 13:25होमपेज › Pune › कचरा समस्या,अतिक्रमणामुळे आरोग्य धोक्यात 

कचरा समस्या,अतिक्रमणामुळे आरोग्य धोक्यात 

Published On: Jun 21 2018 1:23AM | Last Updated: Jun 21 2018 12:30AMपुणे : शिवाजी शिंदे 

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत अत्यंत कडक नियमावली आहे. मात्र, सध्या ती बासनात गुंडाळून ठेवलेली दिसत आहे. कचरा उचलण्यासाठी हातगाड्या घेऊन येणार्‍या कर्मचार्‍यांची मनमानी वाढली आहे. ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम मागणे ती न दिल्यास संबंधित नागरिकाच्या घरातील कचरा न उचलणे, असे प्रकार वारंवार होत आहेत. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबरोबरच रस्त्यावरील फूटपाथवर अतिक्रमणे वाढली आहेत. ती काढण्यासाठी प्रशासन कोणतेही पाऊल उचलताना दिसत नाही. 

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाच्या वतीने कचरा उचलण्यासाठी आठही वॉर्डात घंटागाड्या दिल्या असून, या घंटागाड्यावर काम करण्यासाठी एका कामगाराची नियुक्ती करण्यात आली आहे. कचरा उचलण्याचे काम एका संघटनेस दिले आहे. कचरा उलचण्यासाठी संबंधित कामगारास महिन्याला घरटी पन्नास रूपये दिले जातात. मात्र बहुतांशी वेळा कर्मचारी मनमानी पद्धतीने पैशाची मागणी करीत असतो. तसेच कचरा वेळेवर कधीच उचलत नाही, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. या शिवाय घंटागाड्यांना कचरा उचलण्यासाठी बोर्ड प्रशासन महिन्याकाठी एका गाडीस भाड्यापोटी किमान 70 हजार रुपये देत आहे.

त्यासाठी एका ठेकेदाराच्या सुमारे 25 ते 30 गाड्या कचरा उचलण्यासाठी आहेत. हे भाडे देण्यासाठी नागरिकांच्या करामधूनच रक्कम प्रशासन वसूल करीत असते.  दुसर्‍या बाजूला कचरा उचलणार्‍या कर्मचार्‍यास सुद्धा महिन्याला रक्कम द्यावी लागत आहे. नागरिकांना हा दुहेरी भुर्दंड भरण्याची वेळ आली आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. याबरोबरच डेग्यू, मलेरिया यावर मात करण्यासाठी प्रशासने ठरावीक दिवसांनंतर सर्वच भागात औषधे फवारणे बंधनकारक आहे. मात्र यंत्रणा प्रभावी नसल्यामुळे ही औषध फवारणी होत नाही. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या शिवाय मोकाट जनावरांचा त्रास चांगलाच वाढला आहे. त्यातही ‘वराह’ आणि ‘श्‍वान’ 
या जनावरांचा त्रास मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे.

अतिक्रमणाचे प्रमाण वाढले

आठ ही वॉर्डांमध्ये असलेल्या फूटपाथवर हातगाड्यांचे प्रमाण वाढले  आहे. अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमण ‘जैसे थे’च आहेत. परिणामी नागरिकांना फूटपाथवरून चालणे अवघड झाले आहे. हीच अवस्था रस्त्यांची देखील झाली आहे. मध्यवर्ती भागातील एम. जी. रोडवर एका माजी नगरसेवकाच्या सहकार्यामुळे अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविणे नागरिकांना अवघड झाले आहे. चांगले असलेले फूटपाथ तोडून नवीन बांधणे हे नवीन धोरण प्रशासनाने आखले आहे. मात्र, केवळ आर्थिक उलाढालीसाठी हा उठाठेव अधिकारी करीत आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय कवडे यांनी केला आहे.