Thu, Apr 18, 2019 16:20होमपेज › Pune › उरो रुग्णालयात स्वच्छतेचा ‘क्षय’

उरो रुग्णालयात स्वच्छतेचा ‘क्षय’

Published On: Aug 22 2018 1:23AM | Last Updated: Aug 22 2018 12:56AMपिंपरी : प्रदीप लोखंडे

नवी सांगवी येथील क्षय रुग्णांवर उपचार करणार्‍या उरो रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. या ठिकाणी रुग्णांचे वॉर्ड, स्वच्छतागृहांची सफाई होत नसल्याचे चित्र आहे. रुग्णांवर दोन-दोन दिवस उपचारच केले जात नाहीत. वारंवार तक्रार करूनही दखल न घेतल्यामुळे रुग्ण त्रस्त असल्याचे रुग्णांचे नातेवाईक सांगतात, तर आमच्याकडे सफाई कर्मचारीच कमी असल्याने या समस्या असल्याचे रुग्णालयीन प्रशासन सांगत आहेत. अस्वच्छतेला रुग्णच जबाबदार असल्याचे सांगून वैद्यकीय अधीक्षक बेजबाबदारपणा दाखवित आहेत. त्यामुळे उरो रुग्णालयालाच स्वच्छतेचा क्षय झाला असल्याचे चित्र आहे.

उरो रुग्णालयात क्षय झालेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. त्यामुळे या रुग्णालयात काम करण्यासाठी कर्मचारी व अधिकारी डॉक्टर नापसंती दाखवत आहेत. उपचारासाठी येणार्‍या रुग्णांकडेही येथील डॉक्टर दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकही संताप व्यक्‍त करीत आहेत. या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची संख्याही सध्या कमी आहे. कमी संख्या असतानाही त्यांचा वॉर्ड स्वच्छ ठेवण्यात रुग्णालय प्रशासनास अपयश येत आहे. रुग्णांच्या वॉर्डमधील गाद्या खराब अवस्थेत आहेत. वॉर्डमधील कोपर्‍यात पडलेला कचरा वेळच्या वेळी उचलला जात नाही. या ठिकाणी असणार्‍या खिडक्यांच्या काचाही फुटलेल्या आहेत. त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. रुग्णांच्या वॉर्डशेजारी असणारे स्वच्छतागृह अस्वच्छ आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. या उलट अधिकारी व डॉक्टरांचे स्वच्छतागृह मात्र वेळच्यावेळी स्वच्छ केले जाते. 

या ठिकाणी येणार्‍या रुग्णांवर उपचारास विलंब लावला जात आहे. दाखल झालेल्या रुग्णांनाही दोन दिवस उपचारासाठी वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे डॉक्टरांची रुग्णांविषयी असलेली अनास्था दिसत आहे. रुग्णालयीन प्रशासनाकडून सफाई कर्मचारी संख्या कमी असल्याचे सांगितले जात आहे. रुग्णच अस्वच्छता करत असल्याचे सांगून अधिकारी आपली जबाबदारी टाळताना दिसत आहेत. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांचा जीवच धोक्यात असल्याचे चित्र आहे.