होमपेज › Pune › कामगारांपासून उच्चभ्रूंपर्यंत वाढतेय गांजाची नशा

कामगारांपासून उच्चभ्रूंपर्यंत वाढतेय गांजाची नशा

Published On: Jun 26 2018 1:15AM | Last Updated: Jun 26 2018 1:07AMपुणे : अक्षय फाटक

ताडीवाला रोड  येथे राहतो...मित्रांमुळे गांजाची ओळख झाली अन् व्यसनही... मग तो मिळविण्यासाठी पाटील इस्टेटचा परिसर...! 30 रुपयांना एक गांजाची पुडी घ्यायची आणि नशेत बुडून जायचे..! आता याचे परिणाम दिसत आहेत. दोनच महिन्यांपूर्वी व्यसनमुक्ती केंद्रात उपचारासाठी दाखल झालो आहे... ही कहाणी आहे पुण्यातील एका तरुणाची... हे प्रातिनिधिक उदाहरण झाले; पण  त्याला सहा वर्षांपूर्वी मिळालेली 30 रुपयांची पुडी आता 120 रुपयांना मिळते आणि धक्कादायक म्हणजे गांजा मिळण्याचे शहरातील पत्ते थेट वेबसाईटवर झळकत आहेत. याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने युवक वर्ग व्यसनाकडे ओढला जात आहे. आता  ‘आयटी हब’ म्हणून मिरवणार्‍या शहरात कामगार वर्ग ते उच्चभ्रूंमध्ये गांजाची नशा करण्याचे प्रमाण वाढत आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरे झपाट्याने बदलत आहेत. सर्वांच्या हाताला काम मिळत असल्याने याठिकाणी कामगार वर्ग ते मोठ्या पगाराच्या नोकरदार वर्गाची संख्याही लक्षणीय आहे. त्यासोबतच शिक्षणासाठी जगभरातून आलेल्या तरुण-तरुणींचे प्रमाणही मोठे आहे. कामगार वर्गाकडून गांजा आणि अफू यासारख्या कमी किमतीत मिळणार्‍या अमली पदार्थांना मागणी होते, तर आयटीयन्स आणि गल्लेगठ्ठ पगार असणार्‍या उच्चभ्रूंकडून ब्राऊन शुगर, कोकेन, एमडी यासारख्या अमली पदार्थांची मागणी होते. या प्रकारात शहरात वर्षाला कोट्यवधींची उलाढाल होत असल्याचे पोलिस अधिकारी खासगीत सांगतात. 

नशेसाठी इतर अमली पदार्थ हवे असतील, तर त्याची किंमतही मोठी असते. तसेच हे पदार्थ सहजासहजी मिळत नाहीत. त्या तुलनेत गांजा हा सहज व कमी किमतीमध्ये मिळतो. पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात अशी अनेक ठिकाणे आहेत. त्या ठिकाणी पन्नास रुपयांपासून गांजाच्या पुड्या मिळत आहेत. काही पान टपर्‍यांवरही गांजाच्या पुड्यांची विक्री होते. अशी अनेक ठिकाणे ठरलेली आहेत, तेथे ठराविक वेळेत हे विक्री करणारे येतात आणि गांजा विक्री करून जातात. ओळखीतीलच व्यक्तींना हा गांजा दिला जातो. नवीन व्यक्तींना गांजा सहजासहजी मिळत नाही. गांजाविक्री करणार्‍यांचे मोबाईल क्रमांकही वारंवार बदलले जातात. 

ऑनलाईनही विक्री

सध्या शहरात ऑनलाईन माध्यमातून गांजाची विक्री होत आहे. शहरातील कोणत्या भागामध्ये गांजा मिळतो, त्या ठिकाणांचीही माहिती यात देण्यात आली आहे. गांजाचा भाव  सहा वर्षात चौपट झाल्याचेही यावरून दिसत आहे. ओडिशा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमारेषेवरील काही शहरांमधून गांजा येतो. खासगी वाहनांनी गांजा आणला जात असल्याचे अनेक घटनांवरून समोर आले आहे.