Sun, Feb 23, 2020 15:29होमपेज › Pune › रिक्षा परमिटसाठी बनावट कागदपत्रे बनवणार्‍या टोळीचा पर्दाफाश

रिक्षा परमिटसाठी बनावट कागदपत्रे बनवणार्‍या टोळीचा पर्दाफाश

Published On: Aug 22 2019 1:49AM | Last Updated: Aug 22 2019 1:50AM
पिंपरी : प्रतिनिधी 

प्रादेशिक परिवहन विभागाकडून रिक्षाचे परमिट मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे आणि शिक्के बनवणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सात जणांना अटक केली असून त्यांच्याकडून लॅपटॉप, बनावट शिक्के, प्रिंटर, वाहने असे एकूण 18 लाखांचे साहित्य जप्त केले आहे. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कामगिरी केली.   

अशोक भीमराव जोगदंड (37, रा. निगडी), बालाजी अशोक माशाळकर (40, रा. काळेवाडी), सचिन महादू साळवी (35, रा. तळवडे), मुकुंद दत्तू पवार (30, रा. निगडी), रामदास मच्छिंद्र हारपुडे (35, रा. चिखली), किरण रामभाऊ ढोबळे (26, रा. भोसरी), खेतमल नामदेव पाटील (36, रा. काळेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाच्या परमिटसाठी पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी होणे आवश्यक आहे. या चारित्र्य पडताळणी शिवाय परमिट मिळत नसल्याने पडताळणीचे बोगस प्रमाणपत्र देणारे मोठे रॅकेटच शहरात सुरु झाले. चारित्र्य पडताळणी विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील पिंजण यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने परिवहन विभागाच्या कार्यालयाबाहेर सापळा रचून तेथील स्वयंघोषित एजंटवर नजर ठेवली. त्यांनी सात जणांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांच्या कार्यालयाची झडती घेतली असता पोलिसांना बनावट सही व शिक्क्याची वेगवेगळ्या मजकुराची एकूण 88 बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रे मिळून आली. तसेच, काही शाळा सोडल्याचे कोरे दाखले, मुख्याध्यापकांच्या सहीचे बनावट दाखले, तहसील कार्यालयातून मिळालेले प्रमाणपत्र मिळून आली आहेत. या कागदपत्रांची शहनिशा सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आहे. पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलिस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलिस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, चारित्र्य पडताळणी (विशेष शाखा) विभागाचे पोलिस निरीक्षक सुनील पिंजण, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक लांडगे यांच्या पथकाने केली. 

परमिट होणार रद्द 

या टोळीने यापूर्वी आजतागायत किती जणांना बनावट कागदपत्रांच्या आधारे परमिट मिळवून दिले आहे, याची चौकशी सध्या सुरु आहेत. चौकशीअंती त्या परमिटधारकांचे परमिट बाद होण्याची शक्यता आहे. तसेच, गैर मार्गाने परमिट मिळवणार्‍या रिक्षाचालक देखील अडचणीमध्ये येणार आहेत.

आरटीओचे अधिकारीही संशयाच्या घेर्‍यात 

बेकायदेशीर मार्गाने रिक्षाचे परमिट घेऊन देणारी टोळी मागील एक वर्षपासून प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयामध्ये ऍक्टिव्ह आहे. एका परमिटसाठी 15 ते 80 हजार रुपयांपर्यंत पैसे उकळल्याचे समोर आले आहे. मागील वर्षभरात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार या टोळीने केल्याची शक्यता आहे. ही बाब गंभीर स्वरूपाची असून यामध्ये अधिकारी किंवा इतर कोणीही सहभागी असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर देखील कारवाई होणार असल्याचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितले.