होमपेज › Pune › गणेश विसर्जन हौद बनले कचरा कुंड्या!

गणेश विसर्जन हौद बनले कचरा कुंड्या!

Published On: Dec 08 2017 1:42AM | Last Updated: Dec 07 2017 11:40PM

बुकमार्क करा

पुणे : प्रसाद जगताप

गणेश विसर्जन होऊन काही महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, शहरात गणेश विसर्जन हौद अजूनही उघडेच आहेत. त्यामुळे त्या हौंदामध्ये स्थानिक नागरिकांकडून कचरा टाकण्याचे काम जोरदार सुरू असून सध्या हे हौद कचरा कुंड्या बनल्या आहेत. मात्र, पुणे महानगरपालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

नदीच्या वाहत्या पाण्यात गणेश मुर्तींचे विसर्जन नागरिकांनी करू याकरिता पालिका प्रशासनाकडून शहरात ठिकठिकाणी विसर्जन हौद उभारण्यात आले आहेत. परंतु, या हौदांकडे गणेश विसर्जनानंतर दुर्लक्ष होत असल्याचे पहायला मिळत आहे. शहरातील  प्रत्येक हौदात प्रचंड राडा-रोडा पडला आहे. काही हौदांमध्ये पावसाचे पाणी साठल्यामुळे ते हौद डेंग्यू, मलेरिया यांसारखे आजार पसरविणार्‍या डासांच्या उत्पत्तीचे उगमस्थानच बनले आहेत.

शहरातील नदीपात्र परिसर, गरवारे पूल यांसह शहरी व उपनगरीय भागात पुणे मनपाकडून गणेश विसर्जन हौदांची स्थापना करण्यात आली आहे. परंतु, यातील अनेक हौद उघडे असल्यामुळे ते कचर्‍याच्या कुंड्या बनल्या आहेत. यातील काही हौद वस्त्यांनजीक असल्यामुळे परिसरातील लहान मुले याठिकाणी खेळण्यास जात आहेत. या हौदात पडून अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र, तरी सुध्दा पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पहायला मिळत आहे.