Sat, Feb 16, 2019 01:10होमपेज › Pune › २५१ महिलांनी केला गणेशाचा जयघोष

२५१ महिलांनी केला गणेशाचा जयघोष

Published On: Jan 22 2018 1:23AM | Last Updated: Jan 22 2018 12:01AMपुणे : प्रतिनिधी

‘माघ चतुर्थीला पाळणा हलला... शिव-पार्वतीच्या घरी गणेश जन्मला गं सखे... गणेश जन्मला...’ असा पाळणा म्हणत तब्बल 251 महिलांनी गणेश जन्म सोहळ्यात सहभागी होत गजाननाचा जयघोष केला. ‘ओम गं गणपतये नम:’च्या मंगल स्वरांनी दुपारी 12 वाजता शेकडो गणेशभक्तांच्या उपस्थितीत दगडूशेठ गणपती मंदिरात मोठ्या थाटात गणेश जन्म पार पडला. मंदिरावर केलेली आकर्षक पुष्परचना आणि गाभार्‍यात केलेली सजावट डोळ्यांत साठवत गणेशभक्तांनी बाप्पाचरणी उत्तम आरोग्य आणि सुख-शांतीकरिता प्रार्थना केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने गणेश जन्म सोहळा बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला. शुभांगी भालेराव यांनी गणेश जन्म सोहळ्याचे पौरोहित्य केले. अभिजित बहिरट यांनी सपत्नीक पूजा केली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, माणिक चव्हाण, प्रकाश चव्हाण, शारदा गोडसे, संगीता रासने उपस्थित होते. भक्तांनी 551 किलोचा मोदक बाप्पाचरणी अर्पण केला. गणेश जन्म सोहळ्यानंतर सव्वा लाख तिळाच्या लाडूचे प्रसादवाटप मंदिरामध्ये करण्यात आले.

रविवारी पहाटे 4 वाजता सुप्रसिद्ध गायिका विभावरी आपटे-जोशी यांनी श्री चरणी स्वराभिषेक अर्पण केला. शास्त्रीय गायनासह भक्तिगीते ऐकण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळाली. त्यानंतर सकाळी 8 वाजता गणेश भक्तांच्या हस्ते गणेश याग पार पडला. यामध्ये अनेकांनी सहकुटुंब सहभाग घेतला. दुपारी गणेशाची मंगल आरती करण्यात आली.

सायंकाळी 6 वाजता श्रींची पालखीतून वाजतगाजत नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये फुलांनी सजविलेला आकर्षक रथ, बँड आदी सहभागी झाले होते. दगडूशेठ गणपती मंदिरापासून लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर - रामेश्‍वर चौक - टिळक पुतळा मंडई - कोतवाल चावडी - बेलबाग चौक- लक्ष्मी रस्ता मार्गे नगरकर तालीम चौक - अप्पा बळवंत चौक या मार्गाने गणपती मंदिरात मिरवणुकीचा समारोप झाला. तर रात्री 10 ते पहाटे 3 वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला होता. मंदिराला फुलांसह आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली. पुण्यासह देशभरातील विविध ठिकाणांहून आलेल्या गणेशभक्तांनी बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली.