Mon, May 20, 2019 18:05होमपेज › Pune › गणेश मंडळांना सोमवारपासून मिळणार विविध परवानग्या

गणेश मंडळांना सोमवारपासून मिळणार विविध परवानग्या

Published On: Aug 25 2018 1:16AM | Last Updated: Aug 25 2018 12:46AMपुणे : प्रतिनिधी

शहरातील गणेश मंडळांना विविध परवानग्या देण्यासाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये ‘एक खिडकी’ योजना सुरू करण्यात येणार आहे. येत्या सोमवारपासून मंडळांना ऑनलाईन आणि ऑफलाईन परवानगी अर्ज करता येणार आहे, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली आहे. दरम्यान उच्च न्यायालयाने घालून दिलेले निर्बंध पाळून गणेशोत्सव उत्साहात साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाने गणेश मंडळांना केले आहे. 

आगामी गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीची बैठक शुक्रवारी महापालिकेच्या सभागृहात झाली. या बैठकीस महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, पालिका आयुक्त सौरभ राव, वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त अशोक मोराळे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शहर सुधार समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे, अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप, नगरसेवक दिलीप वेडे पाटील, माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, अण्णा थोरात यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी प्रास्ताविक केले, तर अरविंद शिंदे यांनी गणेशोत्सवाची माहिती दिली. अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी उच्च न्यायालयाच्या नियमांची माहिती दिली. 

गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी येणार्‍या अडचणी व समस्या कथन करताना, जे काम शासनाला जमले नाही, ते काम पुण्यातील गणेश मंडळांनी केली आहे. या काळात हजारो रुपयांची उलाढाल होते, याचा विचार करून नियमांकडे दुर्लक्ष करावे. यात मांडवाची नियमावली शिथील करावी, मेट्रोच्या कामामुळे जेथे अडचण आहे, तेथील मंडळांशी प्रशासनाने आत्तापासूनच संवाद साधावा, वस्तुस्थितीनुसार नियम लावले जावेत, पोलिस खात्याने समन्वय साधावा, गणेशोत्सव काळात स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी, गणेशमूर्ती हौदामध्ये विसर्जित केल्यानंतर पुढील व्यवस्था योग्य पद्धतीने करावी, असा विविध मागण्या केल्या. तसेच कोरेगाव पार्क परिसरात रात्रभर पब आणि बार चालतात, त्यामुळे होणार्‍या ध्वनिप्रदूषणाकडे पोलिस दुर्लक्ष करतात, मात्र गणपती उत्सवातीलच ध्वनिप्रदूषण पोलिसांना दिसते, असा प्रश्‍नही उपस्थित केला. या वेळी बोलताना महापौर टिळक म्हणाल्या, शहराची परंपरा असलेला गणेशोत्सव कोणतेही गालबोट न लागता आपण शांततेत आणि उत्साहात साजरा करू. मंडळांना विविध परवानग्या देण्यासाठी एक खिडकी योजनेसाठी सर्व माहिती असणारा नोडल ऑफीसर नेमण्यात येणार आहे.