Sun, Mar 24, 2019 22:57
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › गांधीजींच्या ‘चले जाव’मुळे ब्रिटिश गेले असे नाही

गांधीजींच्या ‘चले जाव’मुळे ब्रिटिश गेले असे नाही

Published On: Jul 09 2018 1:04AM | Last Updated: Jul 09 2018 12:59AMपिंपरी : प्रतिनिधी 

महात्मा गांधीजींनी चले जाव म्हटले, चळवळ केली म्हणून इंग्रज गेले असे म्हणता येणार नाही. केवळ अहिंसावादी लढाया लढून देशाला स्वातंत्र्य मिळालेले नाही, तर असंख्य क्रांतिकारकांच्या बलिदानातून व कष्टातून हे स्वातंत्र्य मिळाले आहे. स्वातंत्र्य संग्रामाचा विचार करताना स्वातंत्र्यासाठी सन 1857 ते 1947 अशा ज्या ज्या चळवळी उभ्या राहिल्या त्यातून इतिहास घडला, असे वक्‍तव्य लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी केले. चापेकर यांच्या नावाने टपाल तिकिटाचे प्रकाशन महाजन यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, राष्ट्रभक्ती म्हणजे काय हे समजणारे सरकार सत्तेवर आल्याने स्वातंत्र्यवीरांचा सन्मान होत आहे. महापुरुषांची तैलचित्रे, पुतळे किंवा त्यांच्या नावाने टपाल तिकीट काढणे यामागे काही भावना आहेत. 

एकाच घरातील तीन जणांनी स्वातंत्र्यासाठी प्राण दिले. हे चापेकर बंधूंचे उदाहरण सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.गृहराज्यमंत्री हंसराज अहिर म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तीन भावांनी बलिदान दिले,  हे मोठे योगदान आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात पुण्याने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. केंद्रातील सरकार हे देशभक्तांप्रती आदर असणारे आहे. चिंचवड गावातील चापेकर वाड्यात आयोजित या कार्यक्रमास केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, पालकमंत्री गिरीश बापट, खा. शिवाजीराव आढळराव पाटील, अमर साबळे,  राज्याचे मुख्य पोस्ट मास्तर हरीश अग्रवाल, महापौर नितीन काळजे, आमदार गौतम चाबुकस्वार, चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे आदी उपस्थित होते.

टोमणे व चिमटे 

खासदार श्रीरंग बारणे यांनी यावेळी आपल्या कार्यकाळात केलेल्या पासपोर्ट कार्यलय, लोणावळा-पुणे तिसर्‍या व चौथ्या ट्रॅकला मंजुरी, एच.ए.ला केंद्राकडून मदत, माथेरानची ट्रेन पुन्हा कार्यरत, घारापुरी विकास, ‘पवने’तील गाळ काढण्याचे काम याचा उल्लेख केला. भाजपाच्या शहरातील एका नेत्याचे नाव न घेता, मी कोणतीही चुकीची कामे केली नाहीत,  भराव घालून इमारत बांधली नाही, गुन्हेगार पोसले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. पालकमंत्री गिरीश बापट यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच, मी जास्त बोलणार नाही. पुणेकरांना केव्हा, कुठे, काय बोलावे हे चांगले कळते, या शब्दात चिमटा घेतला. नव्या पिढीला इतिहास कळावा यासाठी स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती दिलेल्या चापेकरांच्या नावाने टपाल तिकीट काढणे स्फूर्तिदायी असल्याचे ते म्हणाले. राजकारणात अनेक जण तिकिटामागे असतात. बारणे आपणही तिकिटामागे आहात. पण पहिले हे तिकीट काढले हे स्तुत्य झाले. शेवटी तिकीट मिळाले तरी जनताच सर्वेसर्वा आहे, असे बापट म्हणाले.

स्वातंत्र्य चळवळीत गांधी नंतर आले...

खरे तर 1857 ते 1947 असा स्वातंत्र्यासाठी रणसंग्राम झाला. या काळात स्वातंत्र्यासाठी एक-एक चळवळी झाल्या. महात्मा गांधी नंतर आले. त्यांनी स्वातंत्र्यासाठी घराघरात जाऊन जागृती केली. स्वातंत्र्याची चळवळ स्त्रियांपर्यंत पोहचविली. मात्र, मागची 90 वर्षे विसरून चालणार नाहीत. ‘दे दी हमे आझादी खङ्ग बिना ढाल’  हे मनाला पटत नाही. केवळ अहिंसावादी लढाया लढून देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही. 

पोस्ट ऑफिस ही मृत संस्था झाली होती. आता विविध उपक्रम राबवून पोस्ट खाते पुन्हा ऊर्जितावस्थेत येऊ पाहत आहे. मात्र, आपण पत्र लिहिताना शेजारच्याशी बोलायचे विसरलो आहोत. विद्यार्थी नापास झाल्याने आत्महत्या करतात. घरातून निघून जातात. हे कशामुळे घडते  याचा विचार करण्याची वेळ आली आहे. स्वत:च्या मुलाला वर्षातून एकदा तरी पत्र लिहा. त्यालाही त्याचे मनोगत व्यक्त करण्याची सवय लागू द्या. नाती मजबूत होणे महत्त्वाचे आहे.