Sat, Mar 23, 2019 16:05होमपेज › Pune › गाव दत्तक घेण्यास आमदार गाडगीळांचा नकार...

गाव दत्तक घेण्यास आमदार गाडगीळांचा नकार...

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : विजयकुमार सांगळे

निधी देण्यास शासनाची चालढकल, काम करण्यास स्वातंत्र्य नसणे आणि केवळ योजनांची घोषणा करणे आदी कारणांमुळे काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अनंत गाडगीळ यांनी आमदार आदर्श गाव योजनेअंतर्गत गाव दत्तक घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान निधीअभावी दत्तक घेतलेल्या गावांचा विकास खुंटला असल्याचेही त्यांनी सांगितले.  

केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने योजनांचा पाऊस देशात आणि राज्यात पाडला. योजनांची नावे बदलली. केंद्रातील संसद आदर्श गाव योजनेप्रमाणे राज्यात आमदार आदर्श गाव योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील सर्व आमदारांनी गावे दत्तक घेतली. त्यामुळे गावांचा चांगला विकास होईल, अशी अपेक्षा नागरिकांना लागली होती. मात्र, या योजनेला शासनाचा अतिरिक्त निधी नाही. आमदारांनी आपापल्या विकासनिधीतूनच कामे करावी, असे आदेश राज्य शासनाने दिले. त्यामुळे या योजनेविषयी आमदारांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली. विकासनिधी मतदारसंघातच संपत असून दत्तक घेतलेल्या गावांसाठी स्वतंत्र निधी देण्याची मागणी अनेक आमदारांनी केली. मात्र, तरीही सरकारने दत्तक गावांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली नाही.  

आमदारांना वर्षाला 2 कोटी रुपये विकासनिधी आपापल्या मतदारसंघात विकासाची कामे करण्यासाठी मिळतो. मतदारसंघ मोठे असल्याने हा विकास निधी कमी पडतो, अशा अनेक आमदारांच्या तक्रारी आहेत. तशातच दत्तक गावात विकास निधीतूनच कामे करावी, असे आदेश आल्यामुळे आमदार आदर्श गाव योजनेला कमी प्रतिसाद मिळू लागला. अनेक आमदारांनी गाव दत्तक घेऊन 20 ते 25 कोटी रुपयांचा विकास आराखडा आखला. मात्र, निधी न मिळाल्यामुळे कामे तहकूब करावी लागली. त्यामुळे विकास आराखडा केवळ कागदावरच झाला आहे. 

आमदार गाडगीळ म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार केवळ योजनांची घोषणा करत आहे. काँग्रेसच्या काळातील अनेक योजनांची नावे भाजप सरकारने बदलली असून योजना जुन्याच आहेत. ‘जुन्या बाटलीत नवी दारू’ अशी स्थिती आत्ताच्या योजनांची झाली असल्याचे त्यांनी सांगितले.