होमपेज › Pune › ‘जीएसटी’ सहायक आयुक्‍त लाच स्वीकारताना जाळ्यात

‘जीएसटी’ सहायक आयुक्‍त लाच स्वीकारताना जाळ्यात

Published On: Mar 22 2018 1:45AM | Last Updated: Mar 22 2018 1:34AMपुणे : प्रतिनिधी 

सिव्हिल वर्कच्या वेळी कर कमी भरल्याचे सांगत असेसमेंटची ऑर्डर कंत्राटदाराच्याविरोधात अपिलामध्ये न जाण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुण्यातील जीएसटी  (वस्तू व सेवा कर) कार्यालयातील सहायक आयुक्ताला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.  ‘जीएसटी’ कार्यालय येरवडा येथील कॅन्टीनमध्ये सापळा रचून ही कारवाई बुधवारी करण्यात आली. प्रसाद पुरुषोत्तम पाटील, (48, इ/2, फ्लॅट नंबर 204, प्रसादनगर, वडगाव शेरी, पुणे) असे सहायक आयुक्ताचे नाव आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कंत्राटदार आहेत. त्यांनी 2013 मध्ये केलेल्या सिव्हिल वर्कचे कामाचे वेळी 5 टक्‍के व्हॅट होता. त्याप्रमाणे त्यांनी कर भरलेला होता. प्रसाद पाटील यांनी त्यांना तुम्ही कर कमी भरला आहे. तो आठ टक्क्याप्रमाणे भरावयाचा आहे. त्याप्रमाणे तक्रारदार यांना असेसमेंटची ऑर्डर त्यांच्या विरोधात जाऊ नये, यासाठी तीस हजार रुपयांची मागणी केली. 

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या विभागाच्या पथकाने याची पडताळणी केल्यावर प्रसाद पाटील यांनी तीस हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने येरवडा येथील वस्तू व सेवा कर विभागा (जीएसटी)च्या येरवडा येथील कार्यालयाच्या कॅन्टीनमध्ये सापळा रचला आणि बुधवारी सकाळी प्रसाद पाटील यांनी तीस हजारांची लाच स्वीकारल्यावर रंगेहाथ पकडले. प्रसाद पाटील यांच्यावर येरवडा पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

Tags : Pune, Pune News, bribe, GST assistant commissioner, arrested,