Thu, Sep 20, 2018 00:03



होमपेज › Pune › ‘जीओची’ कामे आमदारांच्या नातेवाईकांना; अजित पवारांचा आरोप

‘जीओची’ कामे आमदारांच्या नातेवाईकांना; अजित पवारांचा आरोप

Published On: May 31 2018 1:45AM | Last Updated: May 30 2018 11:31PM



पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड  शहराकडे  भाजपच्या कोणत्याही नेत्याचे लक्ष राहिले नाही. मुख्यमंत्र्यांना उद्घाटने करायलाही  वेळ नाही. ते जागेवर कळ दाबून उद्घाटने करतात. पालकमंत्री गिरीश बापट यांचेही शहराकडे दुर्लक्ष असल्याने आमदार जोडीला विचारणारे कोणीच राहिले नाही. साहजिकच आमदारांचे ‘तुम्ही आम्ही भाऊ-भाऊ दोघे मिळून खाऊ, खाऊ’ असा कारभार सुरु असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांचे नाव न घेता केली. ‘जीओची’ कामे आमदारांच्या नातेवाईकांना दिली असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

भोसरीत राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत बोलताना अजित पवार  म्हणाले, मी राज्यभरात काम करत असताना काही चुकलो तर पक्षाध्यक्ष शरद पवार मला सांगतात. माझी चूक दाखवितात. पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना एखादे चुकीचे काम होत असेल तर ते मी होऊ देत नव्हतो. आता भाजपच्या राजवटीत त्यांचे आमदार मनमानी पद्धतीने कामकाज करत आहेत. 

कचर्‍याचे टेंडर वाटून घेतले जात आहे रस्त्याच्या इकडले तू खा आणि तिकडले मी खातो असा यांचा कारभार सुरु आहे. महापालिकेतील टेंडर आमदारांच्या नातेवाईकाला दिली जातात, असा आरोप पवार यांनी केला.

मेट्रोला आम्ही परवानगी दिली. कात्रज ते निगडी मेट्रो व्हावी यासाठी आग्रही भूमिका घेतली ; मात्र भाजपने पिंपरीपर्यंतचेच नियोजन केले. पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे काम  सुरु आहे. परंतु, पुण्यात अद्याप एक खांब देखील उभा राहिला नाही. एक खांब उभा राहिला होता. तो देखील पडल्याचे, पवार यांनी सांगितले. मेट्रोला भाजपच्या नेत्यांमुळेच विलंब झाल्याचा आरोप त्यांनी केला.