Sat, Mar 23, 2019 12:01होमपेज › Pune › प्राधिकरणातील ‘गदिमा’ नाट्यगृहाचे काम संथगतीने 

प्राधिकरणातील ‘गदिमा’ नाट्यगृहाचे काम संथगतीने 

Published On: Mar 23 2018 1:59AM | Last Updated: Mar 23 2018 1:59AMपिंपरी :  पूनम पाटील

पिंपरी-चिंचवड शहराची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी शहरात विविध नाट्यगृहांची निर्मिती करण्यात आली; मात्र निगडी  प्राधिकरणातील जनतेला नाट्यगृहाची आजही प्रतीक्षा आहे. एकीकडे महापालिकेचा विकासकामांचा धडाका सुरू आहे, तर या ना त्या कारणाने प्राधिकरणातील गदिमा नाट्यमंदिराचे काम मात्र संथगतीने सुुरू आहे. त्यामुळे प्राधिकरणातील नाट्यरसिकांना गदिमा नाट्यगृहासाठी दीड वर्ष वाट पाहावी लागणार आहे.  

शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणार्‍या नाट्यमंदिराचे वेगळेपण साकारण्यासाठी नाट्यगृह व कलादालन, पार्किंगची व्यवस्था यांसारख्या अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त असे गदिमा नाट्यमंदिर प्राधिकरणातील पेठ क्रमांक 26 मध्ये साकारले जात आहे. प्रख्यात मराठी साहित्यिक व नाटककार कै. ग. दि. माडगूळकर तथा गदिमा यांच्या नावाने हे भव्य नाट्यगृह उभारले जात आहे; मात्र गेली अनेक वर्षे हे नाट्यगृह उद्घाटनाच्या प्रतीक्षेतच आहे.

चिंचवडप्रमाणेच प्राधिकरणात नाट्यरसिक; तसेच कलाकारांची संख्या मोठी आहे. येथील कलारसिकांना सांस्कृतिक व्यासपीठ नाही. इतरत्र जाऊन त्यांना कार्यक्रम सादर करावे लागत आहेत. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहही एक मेपासून दुरुस्तीसाठी बंद राहणार असून, आचार्य अत्रे रंगमंदिर गेले कित्येक महिने दुरुस्तीसाठी बंद आहे. त्यामुळे पिंपळे गुरव व भोसरी येथे कार्यक्रम करावे लागणार आहेत; मात्र प्राधिकरणातील गदिमा नाट्यमंदिराचे काम वेळेत पूर्ण झाले असते, तर आज दोन्ही नाट्यगृहांची उणीव गदिमा नाट्यमंदिरामुळे भरून निघाली असती; परंतु पालिका नाट्यगृहाबाबत आधीपासूनच उदासीन आहे. त्यामुळे कामास विलंब होत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया प्राधिकरणातील नागरिक व्यक्त करत आहेत.

आतापर्यंत 26 कोटी रुपये खर्च 

नाट्यमंदिराच्या उभारणीसाठी अंंदाजे 37 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. आतापर्यंत 26 कोटी खर्च झाला आहे. नाट्यगृहाचे अर्धे काम पूर्ण झाले असल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र बरेच काम बाकी आहे. 

नाट्यगृहाला अजून दीड वर्ष लागणार

गदिमा नाट्यमंदिराचे काम किचकट आहे. फोल्डिंगच्या स्लॅबमुळे वेळ लागत आहे. आरसीसी काम झाले की, कामाला गती येईल. खडक फोडून नाट्यगृहाचे काम सुरू करण्यात आले. त्यात जास्त वेळ गेला. दोन्ही इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. ऑडिटोरीयमचे फोल्डिंग स्लॅब व रूफचे काम बाकी आहे. यासाठी तीन ते चार महिने कालावधी लागेल. त्यानंतर वेगाने इतर कामे सुरू होतील.   - सतीश इंगळे,  कार्यकारी अभियंता

राज्यातील अत्याधुनिक नाट्यगृह

केवळ शहरातीलच नव्हे, तर राज्यातील हे दोन नाट्यगृहे एकत्र असणारे अत्याधुनिक नाट्यगृह असणार आहे. त्यात साडेचारशे फोरव्हीलरच्या पार्किंगची सोय आहे. शहरातील  पाच ते सहा महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना व्यासपीठ नाही; तसेच नर्सरी व शाळा महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना आजवर हक्काचे व्यासपीठ नव्हते. ते या नाट्यगृहाच्या रूपाने लवकरच रसिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.      - राजू मिसाळ, नगरसेवक

 

Tags : pimpri, pimpri news, G D Madgulkar theater,