Tue, Jun 25, 2019 21:19होमपेज › Pune › स्कूलबस चालकांच्या हातात चिमुरड्यांचे भवितव्य

स्कूलबस चालकांच्या हातात चिमुरड्यांचे भवितव्य

Published On: Jun 26 2018 1:16AM | Last Updated: Jun 26 2018 12:39AMपुणे : प्रतिनिधी 

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या वाहन चालकांनी वाहनांची फिटनेस तपासणी करणे बंधनकारक आहे. मात्र, शहरातील निम्म्याहून अधिक स्कूलबस चालकांनी फिटनेस तपासणीला कोलदंडा दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. आरटीओच्या नोंदीत 3 हजार 850 वाहनांची नोंद असून, शाळा सुरू झाल्यानंतरही आतापर्यंत केवळ 1 हजार 635 वाहनांची फिटनेस तपासणी केली आहे. उर्वरित दोन हजारांवर वाहनातून धोकादायक पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, प्रत्येक स्कूलबसची तपासणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सुटीच्या कालावधीत शालेय परिवहन समितीने स्कूलबस वाहनांची फिटनेस तपासणीला प्राधान्य देणे गरजेचे होते. त्यासाठी आरटीओ कार्यालयाकडून वाहनांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्यास काही शाळांनी प्रतिसाद देत वाहनांची तपासणी केली आहे. मात्र, दोन हजारांवर स्कूलबस चालकांनी शाळा सुरू होऊन आठवडा उलटूनही फिटनेस तपासणी केली नाही. परिणामी विविध शाळांच्या स्कूलबस चालकांची मग्रुरी थांबविणार कोण, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.  

न्यायालयाचा आदेश पाळता येईना अन मोडता येईना

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्कूलबस वाहनांची पुनर्तपासणी करणे बंधनकारक आहे. मात्र, एकाच वर्षात दोन वेळा वाहनांची फिटनेस तपासणी करणे वाहन मालकांना आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे वाहन मालकांकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे न्यायालयाचा आदेश असल्यामुळे आरटीओ अधिकार्‍यांना तो पाळावा लागत आहे. त्यामुळे वाहन मालकांना मनस्ताप, तर अधिकार्‍यांना त्रास वाढत असल्याची तक्रार वाहन मालकांनी केली आहे.