Mon, Aug 19, 2019 09:07होमपेज › Pune › गाडी पासिंग करायचीय? दिवसभर थांबा!

गाडी पासिंग करायचीय? दिवसभर थांबा!

Published On: Feb 23 2018 1:24AM | Last Updated: Feb 22 2018 11:02PMपिंपरी : नरेंद्र साठे

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) काय सुरू आहे, असा प्रश्‍न सध्या वाहनचालकांना पडत नसेल तर नवलच. व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस टेस्टसाठी पूर्ण दिवस थांबावे लागत आहे. सकाळी सहापासून वाहनचालक नेमून दिलेल्या ठिकाणी वाहनांच्या रांगा लावतात; मात्र एवढ्या सकाळी येऊन देखील अनेक वेळा अधिकार्‍यांच्या ढिसाळ नियोजनामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत सुद्धा वाहनांची तपासणी पूर्ण होत नाही. ‘पुन्हा आरटीओत येण्याचे झाले, तर डबाच घेऊन यावा लागेल,’ असे वाहनचालक एकमेकांना आरटीओची खिल्ली उडवत म्हणत आहेत.

नागरिकांच्या सुविधेसाठी आरटीओ कार्यालयाने ऑनलाईनसह ऑफलाईन देखील पासिंगसाठी वाहने घेण्यास सुरुवात केली होती. बुधवारी (दि.21) ऑफलाईन वाहने तपासणीचा शेवटचा दिवस होता. प्रत्येक दिवशी ऑनलाईन 132 आणि ऑफलाईन 40 अशा एकूण 172 वाहनांची तपासणी होऊन 250 मीटर बे्रक टेस्टवर चाचणी होणे आवश्यक होते. हा दररोजचा कोटा आरटीओ कार्यालयाकडून ठरवण्यात आला आहे. त्यानुसार मोटार वाहन निरीक्षकांना कामाची विभागणी करून देण्यात आली आहे; मात्र कुठल्या ना कुठल्या कारणाने दररोज यामध्ये व्यत्यय येत आहे. सहा ठिकाणी वाहनांची तपासणी मोटार वाहन निरीक्षकांकडून करण्यात येते. बुधवारी यातील दोन क्रमांकाचा लॉट बंदच होता. नागरिकांच्या सुविधेसाठी ऑफलाईन देखील वाहनांचे पासिंग करून देण्याची सुविधा आरटीओने दिली होती. पुढील एक महिना ऑफलाईन पद्धतीने वाहनांचे पासिंग होणार नसल्याची माहिती सूत्रांकडून समजली.

आरटीओ कार्यालयात येणारी प्रत्येक व्यक्ती येथील कामाच्या पद्धतीमुळे वैतागून जात आहे. 250 मीटर टेस्टिंग ट्रॅकमुळे वाहनांच्या फिटनेस तपासणीत अचूकता आणि वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. फिटनेस तपासणीत काही प्रमाणात अचूकता आल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे; परंतु अधिकार्‍यांच्या मनमानीमध्ये काहीच फरक पडलेला नाही. त्यांच्याकडून वाहनचालकांची सर्रास लूट सुरू आहे. एका लॉटमध्ये थांबल्यानंतर मध्येच तुमचा दुसर्‍या लॉटमध्ये नंबर असल्याचे सांगून एका वाहनचालकाला दोन ते तीन वेळा फिरवण्याचे प्रकार देखील होत आहेत. यासंदर्भात वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालावे, अशी मागणी वाहनचालक करत आहेत.

सकाळपासून थांबलोय, नुसते फिरवतात

सकाळी गर्दी होते म्हणून लवकरच जुन्नरहून पासिंगसाठी गाडी घेऊन आलो. येथे आल्यानंतर दोन-तीन वेळा इकडून तिकडे फिरवले.  मध्येच दुसर्‍या गाड्यांचे देखील पासिंग केले. पण ती शासकीय वाहने असल्याने आम्हाला कुणालाच काही म्हणता आले नाही; पण हे असेच सुरू राहिले, तर आम्ही सकाळी एवढ्या लवकर येऊन देखील पूर्ण दिवस आरटीओतच जात असेल, तर नवीन तंत्रज्ञान येऊन देखील काहीच फायदा नसल्याचे वाहनचालक प्रफुल्ल बेंद्रे सांगतात.