Wed, Mar 20, 2019 12:43होमपेज › Pune › ‘संत गाडगेबाबा ज्ञानप्रबोधनाच्या मुक्त विद्यापीठाचे जनक’

‘संत गाडगेबाबा ज्ञानप्रबोधनाच्या मुक्त विद्यापीठाचे जनक’

Published On: Apr 19 2018 9:18AM | Last Updated: Apr 19 2018 9:18AMपिंपरी : प्रतिनिधी 

 संत गाडगेबाबा ज्ञानप्रबोधनाच्या मुक्त विद्यापीठाचे जनक होते सर्वसामान्यांना अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी लोकांच्याच भाषेत उदाहरणे देऊन त्यांनी प्रबोधनाचे महत्वपूर्ण कार्य केले असे प्रतिपादन प्राध्यापक तेज निवळीकर यांनी येथे केले. जय भवानी तरुण मंडळ व कालीमाता मित्रमंडळाच्या वतीने मोहननगर, चिंचवड  येथे आयोजित फुले शाहू आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालेचे उदघाटनावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रा निवळीकर म्हणाले की, संत गाडगेबाबा ईतिहासात अजरामर झालेले ज्ञानप्रबोधनाच्या मुक्त विद्यापीठाचे जनक होते. गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेऊन ज्ञान,शिक्षण यांचं महत्त्व पटवून देणारे महान संत होते. कर्मकांड दैववादी चमत्कार नाकारणारे ते द्रष्टे समाजसुधारक होते. त्यांच्या बोलण्यात ,निर्णयात व कृतीत एकवाक्यता होती. जनसामान्यांना अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी जनजीवनातली उदाहरणे देऊन प्रबोधन केले. म्हणूनच त्यांच्यासारख्या एका निरक्षर माणसाचे नाव अमरावती विद्यापीठाला देण्यात आले. त्यावर कोणीच आक्षेप घेतला नाही यातच संत गाडगेबाबा यांच्या विचाराचे मोठेपण असल्याचे प्रा निवळीकर म्हणाले.

या कार्यक्रमास नागरी हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष मानव कांबळे,  संयोजक माजी नगरसेवक मारुती भापकर ,दीपक समीन्द्र, संजय जाधव, सतीश चव्हाण, नाना खरात, सोनू जाधव, हौसेराव ठाणाबीर, अभिजित भापकर उपस्थित होते.