Mon, Apr 22, 2019 12:07होमपेज › Pune › टपरीधारकांचा महापालिकेवर मोर्चा 

टपरीधारकांचा महापालिकेवर मोर्चा 

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 12:21AMपिंपरी : प्रतिनिधी 

संत तुकारामनगर, महेशनगर, वल्लभनगर या परिसरामध्ये गेली तीन दिवस अतिक्रमण कारवाई करून टपरीधारकांना विस्थापित केले जात आहे. राजकीय दबावापोटी ही कारवाई केली जात असल्याचा आरोप करीत या कारवाईच्या निषेधार्थ, टपरी-पथारी-हातगाडी पंचायतीच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 7)  हा मोर्चा काढण्यात आला.         
हातगाडीधारक महिला नानी साळवे यांच्या हस्ते महेशनगर येथील शिव-शिल्पास पुष्पहार अर्पण करून मोर्चास सुरुवात करण्यात आली. महेशनगर ते पिंपरी-चिंचवड महापालिका आदी मार्गावरून हा मोर्चा काढण्यात आला. प्रल्हाद कांबळे, बळीराम काकडे, धर्मराज जगताप, माऊली शिंदे, पवन परदेशी, हेमंत मोरे, संतोष परदेशी, अजय वायदंडे आदीसह कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त दिलीप गावडे यांना यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये अतिक्रमण कारवाई ताबडतोड थांबविण्यात यावी. सर्वाना लायसन्स देण्यात यावे. बोगस लाभार्थीवर कारवाई करावी. गोरगरीब प्रत्यक्ष व्यवसाय करणार्‍यांना पक्केगाळे बांधून द्यावेत. हॉकर्स झोन झालेच पाहिजे.

या वेळी बाबा कांबळे म्हणाले की, गोरगरीब स्वयं रोजगार करणार्‍या टपरी धारकांवर राजकीय दबावा पोटी कारवाई करण्यात येत आहे. महापालिका अधिकारी दबावा पोटी काम करत आहेत. संत तुकाराम नगर भागात देखील राजकीय व्यक्‍तींनी बेकायदेशीर हॉटेल टाकून रस्ता अडवला आहे. या हॉटेल मुळे रस्ते छोटे झाले आहेत. वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. या हॉटेलवर कारवाई झाली पाहिजे. टपरीधारकांवरील कारवाई थांबविण्यात यावी. कारवाई न थांबल्यास हे आंदोलन अधिक तीव्र  करून शहरातील सर्व टपरी हातगाडी धारक व्यवसाय बंद ठेवून महापालिकेला घेरावा घालतील आणि कामकाज बंद पडतील असा इशारा बाबा कांबळे यांनी दिला.