Tue, Mar 19, 2019 11:24होमपेज › Pune › कचर्‍यापासून वीजनिर्मिती प्रकल्पांचा कोट्यवधीचा खर्च कचर्‍यातच!

कचर्‍यापासून वीजनिर्मिती प्रकल्पांचा कोट्यवधीचा खर्च कचर्‍यातच!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

शहरात कचर्‍यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून 25 प्रकल्प सुरू केले. मात्र, यामधील अनेक प्रकल्प बंद पडले असून, सुरू असलेले प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रकल्पांच्या नावाखाली पालिकेने केलेला कोट्यवधींचा खर्च वाया गेला आहे.  सजग नागरिक मंचाने केलेल्या पाहणीत आणि मागविलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे. पालिकेने गेल्या काही वर्षांत कचर्‍यापासून वीजनिर्मिती करणारे 25 प्रकल्प शहराच्या विविध भागांमध्ये उभारले आहेत. त्यातून 125 टन कचर्‍यावर प्रक्रियेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

या प्रकल्पांसाठी 16 कोटींचा खर्च करण्यात आला असून, त्यांच्या देखभाल दुरुस्तीवर 2.50 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. मात्र, यामधील बाणेर, हडपसर 1, हडपसर 2, पेशवे पार्क 1 व कात्रज रेल्वे म्युझियम असे पाच प्रकल्प बंद पडले आहेत. याठिकाणी 1 टनही कचराही पाठवला गेलेला नाही; तसेच गॅस व वीज निर्मिती झालेली नाही. यामधील 4 प्रकल्प करार नूतनीकरणाअभावी बंद असल्याचे समोर आले आहे; तर येरवडा, वडगाव 1, वडगाव 2, घोले रोड, वानवडी  या 5 प्रकल्पात 1 युनिटही वीजनिर्मिती झालेली नाही; तसेच पेशवे पार्क 2, घोले रोड, वडगाव 1, वडगाव 2 या प्रकल्पांमध्ये  45 टक्क्यांपेक्षा कमी कचरा जिरवला गेला असून एकूण दररोज 125 टन कचरा जिरविण्याची क्षमता असणार्‍या या 25 प्रकल्पांत मिळून सरासरी 65 टक्के कचरा पाठवला गेला असल्याचे आढळून आले आहे.  

या सर्व प्रकल्पांत पाठविलेल्या कचर्‍यापासून  या प्रकल्पांमध्ये फक्त 53 टक्के क्षमतेने गॅस निर्मिती झाली आहे; तसेच या पाच टनाच्या 25 प्रकल्पांमध्ये दरमहा  4,50,000.00 युनिट्स वीज निर्मिती होणे अपेक्षित आहे, ज्यातून मनपाचे दरमहा 28 लाख रुपये वीजबिल बचत होऊन वर्षभरात 3. 50 कोटी रुपये वाचणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात वर्षभरात वीजनिर्मिती फक्त 31 टक्के क्षमतेने झाली  असल्याचे सजगचे विवेक वेलणकर व विश्‍वास सहस्त्रबुध्दे यांनी केलेल्या पाहणीत आढळून आल आहे. याबाबत ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांच्या पैशांचा कचरा होत असल्याचा आरोप सजगने आयुक्त कुणाल कुमार यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
 


  •