Sat, Jul 20, 2019 21:50होमपेज › Pune › सराईतांकडून तीन पिस्तूल जप्त

सराईतांकडून तीन पिस्तूल जप्त

Published On: Apr 07 2018 1:38AM | Last Updated: Apr 06 2018 11:33PMपिंपरी : प्रतिनिधी

बेकायदेशीररीत्या स्वतःजवळ पिस्तूल बाळगणार्‍या तिघांना अटक करून चिंचवड पोलिसांनी तीन पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे आणि दोन दुचाकी असा एकूण तीन लाख 58 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 5) रात्री साडेदहाच्या सुमारास चिंचवड येथील चिंतामणी चौकात केली. 

दत्ता विठ्ठल आगलावे (25, वृंदावन कॉलनी, चिंचवड), विकास भाऊ कदम (25, रा. औंढे खुर्द, लोणावळा) आणि किरण दत्तात्रय येवले (25,  रा. वाकसाई, बेहरगाव, मावळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी हि माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहायक पोलिस आयुक्त सतिश पाटील उपस्थित होते. चिंचवड पोलिस ठाण्याचे तपासी पथकाचे सहायक निरीक्षक सतिश कांबळे हे परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी वाल्हेकरवाडी परिसरात सराईत गुन्हेगार दत्ता आणि त्याचे मित्र येणार असून त्यांच्याकडे बेकायदेशीर पिस्तूल असल्याची माहिती खबर्‍यामार्फत कांबळे यांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार दोन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. गुरुवारी रात्री साडेआकराच्या सुमारास चिंतामणी चौकात एका दुचाकीवर दत्ता आला. त्याच्या ताब्यात घेवून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तुल आणि जिवंत काडतुसे आढळली. त्याच्या मागे बुलेट दुचाकीवर विकास आणि किरण आला त्यांच्याकडेही पिस्तुल आणि काडतुसे आढळुन आली. तपास चिंचवड पोलिस करत आहेत.

कारवाईनंतर परिस्थिती ‘जैसै थे’

वाल्हेकरवाडी परिसरात काही दिवसांपुर्वी एका गुन्हेगाराच्या पिस्तुलातून त्याच्यावरच गोळीबार झाला होता. यामध्ये तो गुन्हेगार जखमी झाला होता. गोळीबार करणार्‍यांना चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. चिंचवड परिसरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारांचे वास्तव आहे. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची हत्यारे आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. पोलिस वरिष्ठांना दाखवण्यासाठी कागदोपत्री कारवाई करतात मात्र परिस्थीती ‘जैसे थे’च असते. हे आज केलेल्या कारवाईवरुन स्पष्ट होते.

 

Tags : Pimpri, Pimpri news, crime, criminal seized, three pistols,