Thu, Jun 20, 2019 21:40होमपेज › Pune › पिंपरी ते निगडी मेट्रोची धाव सर्व्हिस रस्त्यावरून

पिंपरी ते निगडी मेट्रोची धाव सर्व्हिस रस्त्यावरून

Published On: Jul 07 2018 1:36AM | Last Updated: Jul 07 2018 12:56AMपिंपरी : मिलिंद कांबळे 

पुणे मेट्रोला ‘एक्सप्रेस वे’मधील केवळ 5 किलोमीटर अंतरामध्ये चिंचवड स्टेशन व आकुर्डीतील ग्रेडसेपरेटर आणि निगडी येथील उड्डाणपुलामुळे तब्बल तीन वेळा वळण घ्यावे लागणार आहे. हे वळण टाळण्यासाठी दुसर्‍या टप्प्यातील पिंपरी ते निगडी मेट्रो मार्ग सर्व्हिस रस्त्याने जाणार आहे. तसा ‘डीपीआर’ (सविस्तर प्रकल्प आराखडा) निश्‍चित करण्यात आला आहे. तो या महिन्याअखेरीस पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सादर केला जाणार आहे. 

शहरात मेट्रोची मार्गिका मोरवाडी (चिंचवडच्या एम्पायर इस्टेट उड्डाणपूल) ते दापोडी या मार्गावर ग्रेडसेपरेटरच्या ‘एक्सप्रेस वे’मधील दुभाजकावरून नेण्यात येत आहे. या 7.5 किलोमीटर अंतरामध्ये पिंपरी चौकातील ग्रेडसेपरेटर व नाशिक फाटा चौकातील दुमजली उड्डाणपुलामुळे या दोन ठिकाणी मेट्रो मार्गिकेत वळण घेण्यात आले आहे. मेट्रोच्या दुसर्‍या टप्प्यात पिंपरी ते निगडी या सुमारे 5 किलोमीटर मार्गावर चिंचवड स्टेशन व आकुर्डी येथे असे दोन ग्रेडसेपरेटर आहेत. तर, निगडीत उड्डाणपुल आहे. त्यामुळे तब्बल 3 वेळा मेट्रो मार्गिकेस वळण घ्यावे लागणार आहे. ही बाब तांत्रिक दृष्ट्या किचकट व अधिक खर्चीक असल्याने मार्गिका सर्व्हिस रस्त्यावर सरळ घेण्यात आली आहे. तसा मेट्रोने ‘डीपीआर’ तयार केला आहे. तो जुलैच्या अखेरीस पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यापुढे सादर करण्यात येणार आहे. या ‘डीपीआर’चा खर्च पालिकेने उचलला आहे. 

सर्व्हिस रस्त्यावर 3.5 मीटर रूंदीचा बीआरटीएस लेन निर्माण केल्याने तो मार्ग अगोदरच अरूंद झाला आहे. हा मार्ग 10.50 मीटर आहे. रस्त्यावरील अतिक्रमामुळे व बेशिस्तपणे लावलेल्या वाहनांमुळे हा मार्ग अपुरा पडत आहे. त्यात बीआरटीएसचा बॅरीकेटसच्या बाहेर मेट्रोचे पिलर येणार असल्याने सर्व्हिस रस्ता आणखी दीड ते दोन मीटरने कमी होणार आहे.  त्यामुळे सर्व्हिस रस्ता अरूंद होऊन वाहतूक कोंडीची शक्यता नाकारता येत नाही. 

दुसर्‍या टप्प्यातील मार्गाचा डीपीआर तयार

पुणे मेट्रोच्या दुसर्‍या टप्प्यातील पिंपरी ते निगडी या सुमारे 5 किलोमीटर अंतराचा डीपीआर 6 महिन्यांच्या अल्प कालावधीत तयार करण्यात आला आहे. या मार्गावर चिंचवड, आकुर्डी व निगडी असे 3 स्टेशन असणार आहेत. बीआरटीएस लेनला अडथळा होऊ नये म्हणून त्यांच्या बॅरिकेट्सला लागून पिलर उभे केले जाणार आहेत. सर्व्हिस रस्ता अरुंद होणार असल्याने पदपथ व सायकल ट्रॅक काढून तेथे काँक्रिटीकरण करण्याचे नियोजन आहे. हा खर्च मेट्रो करणार आहे. त्या पद्धतीने डॉ. आंबेडकर पुतळा चौक ते खराळवाडीपर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे, असे मेट्रो प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक गौतम बिर्‍हाडे यांनी सांगितले. तसेच, नाशिक फाटा ते चाकण या 19.50 किलोमीटर अंतराच्या मार्गाचाही डीपीआर तयार झाला आहे. दोन्ही कामास केंद्र व राज्य शासनाने मंजुरी देताच काम सुरू केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.