Sun, Nov 18, 2018 01:19होमपेज › Pune › कोथरूडमध्ये मित्राचा खून

कोथरूडमध्ये मित्राचा खून

Published On: Jul 11 2018 1:48AM | Last Updated: Jul 11 2018 1:41AMपुणे : प्रतिनिधी

प्रेम संबंध असल्याची माहिती प्रेयसीच्या घरी दिल्याच्या कारणावरून अक्षय बाळू जोरी (वय 24, रा. पौड रोड, कोथरूड) याचा त्याच्या  मित्राने बिअरची बाटली गळ्याजवळ खुपसून निर्घृण खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. कोथरूड परिसरातील चांदणी चौकात जैन लोहिया आयटी पार्क मागे ही घटना मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मित्र सुशांत रमेश ओंबळे (वय 24), त्याचा भाऊ प्रशांत रमेश ओंबळे (वय 25, विठ्ठलवाडी, पौड रोड, कोथरूड) व अन्य महेश उर्फ सागर मुकुं द मेस्त्री (वय 29, रा. गुजरात कॉलनी) यांना अटक केली आहे.  यासंदर्भात अक्षयचे वडिल बाळू जोरी (वय 48) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय आणि आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत. सुशांत ओंबळे याचे  दोन वर्षापासून एका तरुणीसोबत प्रेमसंबंध आहेत. अक्षयने दोघांच्या प्रेम संबंधाबाबत संबंधित मुलीच्या घरी माहिती दिली. त्यावरून सुशांत आणि अक्षय यांच्यात वाद झाले होते. ते आपसात मिटवून घेतल्यानंतर ते पूर्वीसारखे मित्रही बनले. अक्षय हा सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घरी आला. त्यावेळी त्याने वडिलांना सुशांतसोबत मुलीवरून दोघांत वाद झाल्याचे सांगितले. मात्र, हा वाद आता मिटल्याने आम्ही चौघे एकत्र पार्टीसाठी जात आहोत असे सांगितले. त्यानंतर अक्षय त्याचे मित्र हे कारमधून मित्राच्या रूमवर पार्टीसाठी आले. तेथे त्यांनी पार्टी केली. त्यानंतर अक्षय व सुशांत ओंबळेमध्ये पुन्हा प्रेयसीच्या घरी माहिती दिल्यावरून वाद झाला.  मात्र, दोघांमधील वाद त्यांच्या मित्रांनी मिटवला. तसेच, सुशांतला त्याच्या घराजवळ सोडले. मात्र, पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सुशांत, त्याचा भाऊ प्रशांत व सागर हे परत रूमवर आले. त्यांनी दरवाजा वाजवून दार उघडण्यास सांगितले. 

अक्षयच्या मित्रांनी या तिघांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुशांत त्यांना धक्का देऊन आत गेला व त्याने बिअरची बाटली हातात घेतली. तसेच, ती जमिनीवर आपटून फोडली. त्यानंतर अक्षयच्या गळ्याजवळ खुपसली. अक्षय रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. त्यानंतर हा प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे उपायुक्त डॉ. बसवराज तेली, कोथरूड पोलिस ठाण्याचे व़िरष्ठ निरीक्षक आप्पासाहेब शेवाळे, उपनिरीक्षक महेश वाघमारे व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, तिघांचा शोध घेऊन त्यांना दुपारी अटक केली.