Tue, Nov 20, 2018 21:05होमपेज › Pune › मोफत पाणी योजना फसवी 

मोफत पाणी योजना फसवी 

Published On: Jan 28 2018 1:38AM | Last Updated: Jan 27 2018 11:30PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील नळजोडाला मीटर असलेल्या प्रत्येक कुटुंबाला महिन्याला सहा हजार लिटरपर्यंतचे पिण्याचे पाणी मोफत देण्याची योजना फसवी आहे. सहा हजार लिटर पाणी नागरिक पाच ते सात दिवसांतच वापरतात. त्यानंतर  एक हजार लिटर पाण्याला  8 रुपयांप्रमाणे  पैसे मोजावे लागणार आहेत. हा प्रचंड भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागणार आहे. त्यामुळे पाण्याचे दर पूर्वीप्रमाणेच ठेवण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.

याबाबत महापौर नितीन काळजे यांना शिवसेनेने पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, स्थायी समितीने शहरवासीयांना सहा हजार लिटरपर्यंत मोफत पाणी देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. यापूर्वी प्रतिदिन एक हजार लिटरला दोन रुपये 50 पैसे इतका दर होता. तो दर 30 हजार लिटरपर्यंत कायम होता. त्यानंतर 30 हजार 1 लिटरपुढे पाच रुपये 50 पैसे इतका दर होता. दोन्ही दरांचे एकत्रीकरण केल्यास 7.50 पैसे इतका होता. त्यामुळे स्थायी समितीने मोफत सहा हजार लिटर पाणी या नावाखाली लोकांची दिशाभूल केली असून, 8 ते 35 रुपये इतकी वाढ केली आहे. हा दर पूर्वीच्या दराच्या पाचपट वाढीव आहे.

सहा हजार लिटर पाणी नागरिक पाच ते सात दिवसांतच वापरतात. याचाच अर्थ आठव्या दिवसानंतर प्रति एक हजार लिटरला आठ रुपयांप्रमाणे नागरिकांना पैसे मोजावे लागणार आहेत. शासन परिपत्रकाप्रमाणे दररोज दरडोई 135 लिटर पाणी देणे बंधनकारक आहे. सरासरी एका कुटुंबात पाच व्यक्ती धरल्यास 675 लिटर पाणी दिले जाते. यामुळे स्लॅब 8 ते 35 रुपये प्रति हजार लिटर असल्याने आत्ताच्या बिलाच्या पाचपट बिल येईल. त्यामुळे ही योजना फसवी असून पूर्वीचे दर कायम ठेवण्यात यावेत. जेणेकरून  नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. त्यावर शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका सुलभा उबाळे, गटनेते राहुल कलाटे यांच्या सह्या आहेत.